‘मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची’; ओबीसींनी ज्यांना मतदान केलं, त्याच सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय, लक्ष्मण हाके यांचा घणाघात
मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी समाज आतापर्यंत एकत्र आला नाही, त्यामुळे तुमच्या अंगावर कपडे राहिले नाहीत, तुम्ही उघडे-नागडे झाले आहात. तुम्ही ज्या पक्षांना मतदान केलं, त्याच सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलं आहे. सत्ताधाऱ्यांना आता तुमची काहीही फिकीर उरलेली नाही, असं वक्तव्य ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलं.

मनोज जरांगे पाटील यांची भाषा जात वर्चस्व सिद्ध करणारी आहे, असा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचा अपवाद सोडला, तर महाराष्ट्राच्या जनमानसाला हाक घालणारा नेता आज नाही. अपवादात्मक परिस्थितीत गोपीनाथ मुंडे यांनी इतरांना एकत्र केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाला दहा-बारा वर्षे झाली असली तरी आजही सत्ताधारी आणि विरोधकांना त्यांचं नाव घ्यावं लागतं, असं हाके यांनी म्हटलं.
कष्टकरी आणि शेतकऱ्यांची मुलं डिग्र्या घेऊन बेरोजगार फिरत आहेत. येणाऱ्या काळात अॅट्रॉसिटीचा कायदाही रद्द होऊ शकतो, असा खळबळजनक दावाही लक्ष्मण हाके यांनी केला. ते बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.भटका-विमुक्त समाज हा जमिनीशी समांतर राहतो. कास्ट स्क्रुटिनीवर कोणालाही दबाव आणता येत नाही. जर दबाव आणला जात असेल, तर तो न्यायदानाच्या प्रक्रियेवर दबाव आणल्यासारखं आहे, असंही हाके म्हणाले.
मनोज जरांगे कधी छगन भुजबळ यांना, तर कधी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतात. त्यांच्यावर आई-माईवरून वक्तव्यं करण्यात आली. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनाही टार्गेट करण्यात आलं. मग ओबीसींनी आपल्या हक्क-अधिकाराबद्दल बोलायचं नाही का? उपोषण करणं चुकीचं आहे का? ही संपूर्ण परिस्थिती भयंकर असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.
पश्चिम महाराष्ट्रात कुणबी नव्हते. मराठा समाजाला कुणबी मान्य करणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे, असा दावा हाके यांनी केला. जरांगे पाटलांना आरक्षण द्यायचं म्हणून घटनादुरुस्ती केली गेली. ईडब्ल्यूएस आरक्षण असताना मनोज जरांगे पाटलांना ओबीसीमधून आरक्षण का देण्यात आलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘त्यांना सगळी महत्त्वाची पदं पाहिजेत, ओबीसींचं काय?’ असा प्रश्न उपस्थित करत लक्ष्मण हाके यांनी सर्व समाजातील घटकांना आवाहन केलं. ‘ओबीसी म्हणून एक या आणि मुंबईकडे चला. आम्हाला कुणाबद्दलही द्वेष नाही. जरांगे पाटलांचा आणि आमचा बांधाला बांध आहे का? जे संविधानाला आणि सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, ते आरक्षण कशासाठी पाहिजे?’ असा सवालही त्यांनी केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखी माणसं ओबीसीचे दाखले काढत असतील, तर ओबीसी आरक्षण कसं टिकणार, हे सरकारने सांगावं, अशी मागणीही हाके यांनी केली. ‘कुठे गेला पुरोगामी महाराष्ट्र? कुठे गेला आंबेडकरांचा महाराष्ट्र?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ओबीसी नेत्यांनाच नव्हे तर भाजपालाही निवडणूक आली की ओबीसी हवा असतो, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. सर्व पक्षांनी ओबीसी सेल काढले आहेत, मग ओबीसी सेलचे प्रमुख आरक्षणाच्या मुद्द्यावर का बोलत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून हाके म्हणाले की, ‘22 लाख 20 हजार 577 कुणबी प्रमाणपत्रं वाटली गेली. मराठा समाजाचं मागासलेपण नाकारलं गेलं असतानाही तुम्ही ही प्रमाणपत्रं वाटली आहेत. मग ओबीसीचं आरक्षण कसं टिकणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘साडेआठला निवडून आले आणि अकरा वाजता ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं आणि ते दाखवलं. मुख्यमंत्री साहेब, आरक्षण कसं टिकणार ते सांगा,’ असंही हाके यांनी म्हटलं.
ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांवर संताप व्यक्त केला. ओबीसी आरक्षण गेल्याची भावना तमाम ओबीसी समाजामध्ये निर्माण झाली आहे, असंही त्यांनी सांगितलं.‘ओबीसी मंत्र्यांनो, तुम्ही बोलत का नाही? तुमचंच खरं असेल तर आम्ही खोटं बोलतो, हे तरी ओबीसींना सांगा,’ असं आवाहन हाके यांनी केलं. ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, हे आम्हाला सांगा,’ असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
महाराष्ट्रात ओबीसींसाठी 29 टक्के आरक्षण आहे. यामध्ये 27 टक्के मंडल आयोगानुसार आणि उर्वरित आरक्षण इतर घटकांसाठी असल्याचं हाके यांनी सांगितलं. यामध्ये बायफरकेशन करण्यात आलं आहे. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीमध्ये ओबीसींचे हाल होणार असल्याचा दावा त्यांनी केला.‘मराठा समाजाच्या या स्पर्धेत ओबीसी टिकू शकेल का मुख्यमंत्री साहेब?’ असा सवाल करत हाके यांनी पंचायतराज निवडणुकांचाही उल्लेख केला. मराठा समाजाने ओबीसीचे दाखले काढून जागा हडप केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘आता ओबीसीमध्ये फक्त आणि फक्त मराठा-कुणबी दिसतील,’ असंही ते म्हणाले.
जरांगे आणि हाके यांनी एकमेकांना टार्गेट करण्याच्या राजकारणाचा महाराष्ट्रातील जनतेला कंटाळा आला आहे, असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. ‘जरांगेंनी आणखी आंदोलन केलं, तर सर्व मराठे ओबीसीमध्ये येतील,’ असा दावा त्यांनी केला.तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांनी एसीबीसीचं आरक्षण कशासाठी आणलं, असा सवालही हाके यांनी उपस्थित केला.
सरकार आमची मागणी मान्य करण्यास तयार नाही आणि विरोधकही आमचा प्रश्न मांडत नाहीत, असा आरोप करत लक्ष्मण हाके यांनी 1 सप्टेंबरच्या मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं. ‘जाती-जातींत भांडत बसू नका. ओबीसी आरक्षणातून हद्दपार झाला आहे. आपल्याला हे आरक्षण वाचवायचं आहे,’ असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलं.




