तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले
मुंबई (प्रतिनिधी) : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या खाद्यपदार्थ, उत्पादनं आणि हॉटेल्सवर कारवाईचा धडाका लावला आहे.जवळपास दररोज एफडीएच्या पथकांकडून राज्यातील कुठल्या ना कुठल्या भागात संबंधित आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये भेसळयुक्त माल पकडण्यापासून ते हॉटेल, डेअरी आणि दुकानांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यापर्यंतची कारवाई केली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एफडीएकडून सुरू असलेल्या या धडक कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचं कौतुक केलं.महाराष्ट्रात ठिकठिकाणी एफडीएकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भेसळयुक्त पदार्थांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता होती आणि ही कारवाई सध्या सुरू आहे, याचा मला आनंद आहे.
तसंच, यापुढेही एफडीएकडून अशाच प्रकारची धडक कारवाई सुरू राहील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची 11 ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली होती. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत एकनाथ शिंदे यांना माहिती देण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या कारवाईची माहिती तुकाराम मुंढे यांनी या बैठकीत दिली. यानंतर राज्यातील दूध, पनीर, दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 म्हणजेच मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.तसंच, न्यायालयात या प्रकरणांची सुनावणी सुरू असताना कायदेशीर बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी अनुभवी कायदेतज्ज्ञांची मदत घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी तातडीने विशेष कायदेशीर पथकाची स्थापना करण्याचे आदेशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएकडून सुरू असलेली भेसळविरोधी कारवाई आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.




