विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’

विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती, 2027 च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाने संघटनेत मोठे फेरबदल करताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या राज्य प्रभारीपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. कालच भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच तावडे यांच्यावर देशातील राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

आगामी 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यासोबतच पक्षाने इतर राज्यांमध्येही प्रमुख नियुक्त्या केल्या आहेत. तरुण चुग यांच्याकडे गुजरातची, तर सतीश पुनिया यांच्याकडे पंजाबची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विनोद तावडे यांचा राजकीय प्रवास आणि प्रमुख जबाबदाऱ्या :

* 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या निवडणूक प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. विविध राज्यांमधील बैठकांचे समन्वयन करत एनडीएतील मित्रपक्ष आणि पाठिंबा देणाऱ्या पक्षांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

* त्यानंतर 2025 च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांच्या निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. यावेळीही त्यांनी एनडीएतील मित्रपक्ष आणि पाठिंबा देणाऱ्या पक्षांमध्ये समन्वय साधला.

* 2020 मध्ये त्यांची हरियाणाचे राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती झाली. या काळात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

* 2022 मध्ये त्यांच्याकडे बिहारची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्यात ते प्रमुख रणनीतीकार ठरले. 2023 मध्ये राजद-जदयू सरकार हटवून एनडीए आघाडीचे सरकार स्थापन करण्यात त्यांच्या रणनीतीची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने प्रभावी कामगिरी केली. त्यानंतर 2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

* चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीचे निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. शहरातील महापालिका निवडणुकीत सलग पाच वर्षे भाजपच्या यशात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं.

*‘संघटन पर्व 2024’ अंतर्गत सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय प्रभारी म्हणून त्यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं. अवघ्या 15 दिवसांत देशभरात 5 कोटी सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट भाजपने गाठलं.

* उत्तर प्रदेशातील संघटनात्मक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे.

* 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान लोकसभा मतदारसंघांच्या दोन श्रेणींमध्ये स्टार प्रचारकांच्या दौऱ्याची रणनीती आखण्याची आणि तिची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

* त्रिपुरा आणि राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाच्या निवड प्रक्रियेत निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.

* उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या व्यवस्थापनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

* ‘मन की बात’, ‘हर घर तिरंगा यात्रा’, ‘चांद्रयान मोहीम’ आणि ‘मेरी माटी मेरा देश’ यांसारख्या विविध राष्ट्रव्यापी मोहिमांचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांनी काम केलं.

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेन युद्धक्षेत्रात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

* प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि प्रधानमंत्री स्वामित्व योजना यांसारख्या सरकारी योजनांच्या राष्ट्रीय पातळीवरील अंमलबजावणीवरही त्यांनी देखरेख केली.

* गुजरात, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तराखंड, दिल्ली यांसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती आणि निवडणूक कामकाज त्यांनी सांभाळलं.

* 2026 च्या केरळ विधानसभा निवडणुकीचेही ते निवडणूक प्रभारी होते. या निवडणुकीत पक्षाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.

* विनोद तावडे हे महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सध्या ते वित्तविषयक स्थायी समिती आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

* उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राजकीय राज्याची जबाबदारी आता विनोद तावडे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे 2027 च्या विधानसभा निवडणुकीत तावडे भाजपसाठी कोणती रणनीती आखतात आणि पक्षाला कितपत यश मिळवून देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.