मुलीसोबत बोलतानाचा व्हिडीओ काढल्याचा राग; डोक्यात कोयत्याने वार करून दुसऱ्या मजल्यावरून फेकलं, नाशिकमध्ये धक्कादायक घटना

मुलीसोबत बोलतानाचा व्हिडीओ काढल्याचा राग; डोक्यात कोयत्याने वार करून दुसऱ्या मजल्यावरून फेकलं, नाशिकमध्ये धक्कादायक घटना

मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या विल्होळी गावात रविवारी रक्तरंजित घटना घडली. मालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या मजूर राहुल सरकटे याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला दुसऱ्या मजल्यावरून फेकून देत निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करत तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. अजय गांगुर्डे, वैभव मेंघाळ आणि दीपक पारधी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दीपक पारधी हा त्याच्या मैत्रिणीसोबत बोलत असतानाचा व्हिडीओ शांताराम गाडेकर याने काढला होता. याचा राग मनात धरून दीपकने शांतारामचा काटा काढण्याचं ठरवलं. यासाठी त्याने आपले दोन साथीदार अजय गांगुर्डे आणि वैभव मेंघाळ यांना बोलावून घेतलं. त्यानंतर हे तिघे शांताराम गाडेकर याच्या घरी पोहोचले. यावेळी शांतारामचा ड्रायव्हर असलेल्या राहुल सरकटेला काहीतरी चुकीचं घडणार असल्याचा संशय आला.

राहुलने शांतारामला, ‘तू पळून जा, हे तुला मारणार आहेत,’ असं सांगितलं आणि तोही त्याच्या मागे पळाला. मात्र, हल्लेखोरांच्या तावडीत राहुल सरकटे सापडला. आरोपींनी त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि त्याला शांताराम गाडेकर यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं. त्यात राहुलचा मृत्यू झाला. त्यानंतर तिघेही आरोपी पसार झाले.मालकाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या राहुलचा या घटनेत निर्घृण खून झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथकं रवाना केली. तपासादरम्यान शनिवारी सायंकाळी इगतपुरी येथून तिन्ही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं.

दरम्यान, शांताराम गाडेकर याने दीपक पारधीच्या मैत्रिणीसोबत बोलतानाचा व्हिडीओ काढल्याचा राग दीपकच्या मनात होता. त्यातून शांताराम गाडेकरचा काटा काढण्यासाठी त्याने यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या अजय गांगुर्डे याला बोलावलं. त्यानंतर अजय गांगुर्डे आणि वैभव मेंघाळ यांनी दीपक पारधीसोबत शांताराम गाडेकरचं घर गाठलं.मात्र, शांताराम गाडेकरला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल सरकटेवरच आरोपींनी हल्ला केला. त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आलं.

या संपूर्ण घटनेत राहुल सरकटेचा कोणताही संबंध नसताना केवळ रागातून त्याची हत्या करण्यात आली. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांमुळे अशा गंभीर घटना घडत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करावी आणि राहुलला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.राहुलच्या कुटुंबात आई-वडील, दोन भाऊ, त्यांच्या पत्नी आणि मुलं आहेत. सर्व भावंडांमध्ये राहुल सर्वात लहान आणि शांत स्वभावाचा होता. मात्र, राहुलच्या अचानक झालेल्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.