CCTV झाकले अन् संशय बळावला! सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळा कसा उघड झाला? जाणून घ्या Inside Story

CCTV झाकले अन् संशय बळावला! सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळा कसा उघड झाला? जाणून घ्या Inside Story

मुंबई: प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरातील देणगी अपहार प्रकरणावरून सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षाला तब्बल १८ कोटी रुपयांच्या अपहाराचा गंभीर आरोप केल्यानंतर हे प्रकरण अधिकच तापले आहे. मात्र, व्हीआयपी दर्शनाच्या तक्रारींपासून सुरू झालेला तपास थेट देणगीपेटीतील चोरीपर्यंत कसा पोहोचला आणि हा संपूर्ण घोटाळा उघडकीस कसा आला? याची रंजक आणि महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.

व्हीआयपी दर्शनाच्या तपासातून चोरी उघड

'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार, २०२३ च्या शेवटी सिद्धिविनायक मंदिराचे नवीन विश्वस्त मंडळ अस्तित्वात आले. त्यावेळी काही कर्मचारी भाविकांकडून 'व्हीआयपी दर्शनासाठी' बेकायदेशीरपणे पैसे घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

विश्वस्त राहुल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी जेव्हा मंदिराचे CCTV फुटेज तपासणे सुरू झाले, तेव्हा काही कर्मचारी चक्क देणगीपेटीतूनच पैसे काढत असल्याचे भयानक वास्तव समोर आले.

देणगी स्थिर अन् CCTV कॅमेरा झाकला!

मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती, मात्र त्या तुलनेत मंदिराचे देणगी उत्पन्न मात्र स्थिरच राहत होते. त्यामुळे मंदिराचे अध्यक्ष सदा सरवणकर व विश्वस्त भास्कर शेट्टी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) मदत घेतली. तत्कालीन ACB प्रमुख विश्वास नांगरे-पाटील यांनी काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

तपासादरम्यान देणगी मोजण्याच्या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. याच काळात एका दिवशी देणगी मोजणीच्या ठिकाणचा CCTV कॅमेरा जाणीवपूर्वक झाकल्याचे (Block केल्याचे) निदर्शनास आले. मार्च महिन्यात कर्मचारी राजेंद्र पेंडुरकर याला पुजाऱ्यांच्या खोलीतील देणगीपेटीतून अनधिकृतपणे पैसे काढताना रंगेहाथ पकडण्यात आले.

एकट्याचे काम नाही; १९ कर्मचारी निलंबित

या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात २० मार्च रोजी रीतसर FIR दाखल करण्यात आला. तपासात एकूण ९ कर्मचाऱ्यांचे रॅकेट समोर आले. याशिवाय व्हीआयपी दर्शनासाठी पैसे उकळण्यासारख्या गैरप्रकारात सहभागी असलेल्या आणखी १९ कर्मचाऱ्यांनाही प्रशासनाने निलंबित केले आहे.

१८ कोटींच्या दाव्यावर काय आहे वास्तव?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दावा केला होता की, चोरी उघडकीस येण्यापूर्वी आठवड्याला ५० लाख रुपये देणगी जमा होत होती, ती आता १.५ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. त्यानुसार वर्षाला १८ कोटींची चोरी होत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, FIR किंवा पोलिसांच्या चार्जशीटमध्ये १८ कोटींच्या आकड्याचा उल्लेख नाही. दादर पोलिसांनी ९ जणांना अटक करून आरोपपत्र दाखल केले आहे. मंदिर ट्रस्टला अधिक चौकशी हवी असल्यास ते न्यायालयात दाद मागू शकतात, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील विधी व न्याय विभागाने सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचा संपूर्ण आर्थिक अहवाल मागवला असून, लवकरच या संपूर्ण व्यवहारांचे विशेष ऑडिट केले जाण्याची शक्यता आहे.