मेट्रोचा स्लॅब कोसळला,एकाचा मृत्यू, काही जण जखमी, मुलुंडच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात
मुंबई (प्रतिनिधी) : घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. त्यासाठी याठिकाणी दररोज भलेमोठे गर्डर आणि स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरु असते. आज शनिवारी मेट्रोचा एक स्लॅब खाली कोसळला. त्यावेळी खालच्या एलबीएस रोडवरुन वाहने ये-जा करत होती. हा स्लॅब एका ऑटो रिक्षावर आणि कारवर कोसळला आहे. स्लॅबच्या खाली आलेल्या वाहनांच्या भागाचा चेंदामेंदा झाला आहे. हा स्लॅब कोसळला तेव्हा रिक्षातून तीन जण आणि ड्रायव्हर प्रवास करत होते. हे चार जण अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे.जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्लॅबच्या खाली दबून वाहनांचा झालेला चेंदामेंदा बघता जखमींपैकी काहीजण दगावल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बीएमसीने या घटनेबाबत माहिती देताना म्हटले आहे की, "आज दुपारी १२.२० वाजता मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस रोडवरील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. बांधकाम सुरू असताना सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळून रिक्षावर पडला. मुंबई अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी उपस्थित आहेत. ऑटोरिक्षातील ३-४ जण जखमी झाल्याची शक्यता आहे.




