पंचगंगा नदी ३२ फुटांवर तर राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे खुलेच
कोल्हापूर/प्रतिनिधी: कोल्हापुरात दोन दिवसांपासून पावसाची काहीशी उघडझाप पाहायला मिळत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं चांगलचं झोडपून काढलं होतं. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने दमदार हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी केलं आहे. तर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संतधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. तर पावसाच्या उघडझापमुळे शेतीकामांना वेग आला असून नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या कोल्हापूरची जीवन वाहिनी असलेल्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ३२ फूट ७ इंचावर पोहोचली आहे. नदीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३८ बंधारे सध्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे काही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे ३ राज्य मार्ग आणि ३ जिल्हा मार्ग बंद आहेत. तर ग्रामीण भागातील सावर्डे - मांगले मार्गावर अवजड वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग अवजड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे.
दुसरीकडे, धरण क्षेत्रात कोसळणाऱ्या सततच्या पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. राधानगरी धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. तर जिल्ह्यातील इतर धरणांचा विचार करता वारणा धरण देखील ८६ टक्के क्षमतेने भरले आहे. तुळशी धरण ८९ टक्के भरले असून, दूधगंगा धरण ७१ टक्के भरले आहे.
तर राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ३ आणि ६ असे दोन स्वयंचलित दरवाजे सद्य स्थितीला खुले आहेत. या दोन्ही दरवाजातून सध्या २८५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तसेच गेल्या २२ जुलैपासून राधानगरी धरणाच्या विद्युत गृहामार्फत १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात आधीपासूनच सुरू होता. तर सध्या ३ आणि ६ नंबरच्या स्वयंचलित दरवाजातून २८५६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरु असून एकूण ४२५६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. तर राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने प्रशासनाकडून भोगावती नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांमधील पाणी साठा झपाट्याने वाढत असल्यामुळे नद्यांची पातळी ही वाढली असली, तरी सध्या पावसाच्या उघडझाप पणामुळे शेतकऱ्यांना शेतीकामात मोठी मदत होत आहे.
तसेच, संभाव्य पुराची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




