एका दिवसासाठी CM बनवलं तर काय कराल? तुकाराम मुंढेंचं उत्तर ऐकून सगळेच थक्क!
मुंबई (प्रतिनिधी) : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या राज्यभरात आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे चर्चेत आहेत. गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त दूध आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट्सविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेतल्याने अन्न माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

अशातच एका मुलाखतीत त्यांना एक रंजक प्रश्न विचारण्यात आला."नायक सिनेमाप्रमाणे तुम्हाला एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनवलं आणि अमर्याद अधिकार दिले, तर तुम्ही काय कराल?"या प्रश्नावर तुकाराम मुंढे यांनी अतिशय संयत आणि वास्तववादी उत्तर दिलं. ते म्हणाले, "लोकशाही व्यवस्थेत कोणालाही अमर्याद अधिकार नसतात. मी एक शासकीय कर्मचारी आहे आणि माझं काम समाजाला सक्षम करणं, योग्य मार्गदर्शन करणं आणि विकासाच्या दिशेने पुढे नेणं हेच आहे."
ते पुढे म्हणाले, "मला कोणतीही जबाबदारी दिली तर ती पूर्ण पारदर्शकतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेन. प्रत्येक दिवशी एक पाऊल पुढे कसं जाता येईल, यावर माझा भर असतो."लोक त्यांना "नायक" म्हणतात, यावर प्रतिक्रिया देताना मुंढे म्हणाले, "मी शासकीय नोकर आहे आणि मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. लोकांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे."
दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी तुकाराम मुंढेंकडे सोपवण्यात आल्यानंतर त्यांनी धडक कारवायांची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे राज्यभर त्यांच्या कामाची जोरदार चर्चा होत आहे.




