राज ठाकरेंच्या हिंदीच्या सवालाला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘मिसिंग लिंक’ प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरड दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यातही शाब्दिक चकमक रंगली आहे. विधानसभा सभागृहात विरोधकांना उत्तर देताना फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नसल्याचे ठामपणे सांगितले, तर त्यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी हिंदीत का बोलावे, असा प्रश्न उपस्थित केला होता. या टीकेला आता फडणवीसांनी सभागृहातूनच जोरदार प्रत्युत्तर दिले.

मिसिंग लिंक संदर्भात चुकीची माहिती पसरवून राज्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कनेक्टिंग लिंक संदर्भात ७ हजार जण पाण्यात गेले, अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणे हा माझा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. माझ्यावर टीका करा, पण राज्याची बदनामी करणारे आरोप स्वीकारले जाणार नाहीत.”
यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेचाही अप्रत्यक्ष समाचार घेतला. “मी हिंदीत एक वाक्य बोललो, कारण ज्यांना ते समजणे आवश्यक होते त्यांच्यासाठी ते बोललो. पण ज्यांचा त्याच्याशी संबंध नव्हता, त्यांनाच त्याची जास्त मिर्ची लागली,” असा टोला त्यांनी लगावला.फडणवीस पुढे म्हणाले, “मी ‘भाडे ते टट्टू’ असा उल्लेख केल्यानंतर काहींना त्याचा त्रास झाला. मग मी त्या शब्दाचा अभ्यास केला. सुसंस्कृत भाषेत त्याला ‘भाटक गदर्भ’ म्हणतात. तरीही कोणाला अर्थ समजत नसेल तर ‘सुपारीबाज’ हा शब्द योग्य ठरेल.”
सभागृहात बोलताना त्यांनी आणखी एक उपरोधिक टिप्पणी केली. “मी काही सुपारीबाजांविषयी बोललो होतो. मी तर टोपी फेकली होती, पण ती अनेकांच्या डोक्यावर कशी बसली हे मला समजलं नाही,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
राज ठाकरे यांचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “आमचे मिमिक्री आर्टिस्ट म्हणाले, मुख्यमंत्री हिंदीत का बोलले? ते आमचे मित्र आहेत. राजकारणात त्यांच्यापासून आम्हाला कोणताही धोका नाही. मात्र त्यांनी राजकारणाऐवजी मिमिक्रीच्या क्षेत्रात करिअर केलं असतं, तर आज एकाही स्टँडअप कॉमेडियनला बाजारपेठ उरली नसती,” असे म्हणत त्यांनी सभागृहात मिश्किल टोला लगावला.




