राज्यातील २७ जिल्ह्यांत मुसळधारचा इशारा; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरात काय असणार स्थिती?
मुंबई:‘एल निनो’च्या चिंतेनंतरही यंदा महामुंबई क्षेत्रात मान्सूनने दमदार कामगिरी केली आहे. ऑगस्टच्या मध्य्यातच मुंबईतील पावसाने मोसमाची सरासरी ओलांडली असून, आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.

बंगालच्या उपसागरातील प्रणालीचा परिणाम:
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र झारखंडच्या दिशेने सरकत आहे. याशिवाय नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर आणि गोंदिया या भागांत परस्परविरोधी वारे वाहू लागल्याने चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम म्हणून कोकण, विदर्भ, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.
विभागनिहाय पावसाची स्थिती:
· कोकण व मुंबई: पुढील दोन आठवडे (२७ ऑगस्टपर्यंत) संपूर्ण कोकण पट्ट्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल.
· पुणे व मध्य महाराष्ट्र: पुण्यासह लगतच्या भागात पुढील ३ दिवस रिमझिम ते मध्यम पाऊस पडेल, मात्र घाटमाथ्यावर मुसळधार सरींचा इशारा देण्यात आला आहे.
इतर जिल्हे: नाशिक, सातारा, सांगली आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान तज्ज्ञांचा अंदाज:
निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार— हवामानातील बदलांमुळे कोकण, विदर्भ, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची दाट शक्यता आहे.




