तरुणाई विचारांच्या गुलामगिरीत अडकतेय; तुकाराम मुंढेंचं Gen-Z ला महत्त्वाचं आवाहन

तरुणाई विचारांच्या गुलामगिरीत अडकतेय; तुकाराम मुंढेंचं Gen-Z ला महत्त्वाचं आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : एफडीएचे आयुक्त तथा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अमरावती येथे आयोजित 'संवाद तरुणाईशी' कार्यक्रमात जेन-झी पिढीला मार्गदर्शन करताना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विवेक, कौशल्य आणि विचारशक्ती यांचे महत्त्व अधोरेखित केले.

ते म्हणाले, तरुणांनी न्यूनगंड बाजूला ठेवून स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. सोशल मीडियावरील प्रत्येक माहितीवर आंधळा विश्वास ठेवू नये आणि एआयचा वापर विवेकाने करावा. शिक्षणासोबत कौशल्य आणि विचारशक्ती विकसित करणे हीच आजच्या पिढीच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

तुकाराम मुंढे पुढे म्हणाले, आज आपण ऐकतच नाही, फक्त आवाज करतो. आपल्याला जे आवडतं तेच पाहायचं, तेच ऐकायचं आणि तेच मान्य करायचं, अशी मानसिकता वाढत आहे. जर आपण या विचारांच्या गुलामगिरीत अडकलो असू, तर त्यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विवेक. तो मशीनमध्ये, अल्गोरिदममध्ये किंवा AI मध्ये नाही, तर आपल्या विचारांमध्ये आहे.

इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि समाजसुधारकांचा उल्लेख केला. सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महान व्यक्तींनी समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात संघर्ष करून नवा विचार दिला. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालतो आहोत का, याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज असल्याचेही तुकाराम मुंढे यांनी सांगितले.