मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद; केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती, मुंबई-पुणे-ठाण्याला मोठा फटका!

मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद; केंद्र सरकारने लोकसभेत दिली माहिती, मुंबई-पुणे-ठाण्याला मोठा फटका!

मुंबई (प्रतिनिधी) : मागील पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रात तब्बल 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांच्या सध्याच्या स्थितीबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केंद्र सरकारने ही माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक कंपन्यांना टाळे लागले आहेत.

मुंबई : 12,009 कंपन्या बंद

पुणे : 6,433 कंपन्या बंद

ठाणे : 4,704 कंपन्या बंद

नागपूर : 1,478 कंपन्या बंद

नाशिक : 840 कंपन्या बंद

रायगड : 822 कंपन्या बंद

छत्रपती संभाजीनगर : 654 कंपन्या बंद

कंपन्या बंद पडण्याचा परिणाम विविध उद्योग आणि क्षेत्रांवरही झाला आहे :

व्यापार क्षेत्र (Trading) : 4,196 कंपन्या

बांधकाम क्षेत्र (Construction) : 2,356 कंपन्या

शेती क्षेत्र (Agriculture) : 1,178 कंपन्या

सेवा व इतर क्षेत्र (Service & Others) : 

एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी समोर आली असली, तरी या कंपन्या नेमक्या कोणत्या कारणांमुळे बंद पडल्या? तसेच याचा राज्यातील रोजगारावर नेमका किती आणि कसा परिणाम झाला? असे महत्त्वाचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत.इतक्या मोठ्या संख्येने उद्योग बंद पडल्यामुळे राज्यातील औद्योगिक वातावरण आणि स्थानिक रोजगारावर याचा किती खोल परिणाम झाला आहे, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून हजारो कंपन्या बंद पडल्याची अधिकृत माहिती समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारला खोचक सवाल केला आहे.रोहित पवार यांनी म्हटलं आहे की, देशाचे ‘Growth Engine’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात मागील 5 वर्षांत तब्बल 36 हजार 211 कंपन्या बंद पडल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तब्बल 12 हजार कंपन्या बंद पडल्याची माहिती स्वतः केंद्र सरकारने लोकसभेत दिली आहे.

या कंपन्या बंद पडल्याने राज्यातील लाखो तरुण रोजगारापासून वंचित झाले आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.मागील पाच वर्षांत सत्तेच्या रस्सीखेचीत व्यस्त असलेल्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य अशा महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष झालं असून, त्याचाच हा परिणाम असल्याची टीका त्यांनी केली.“आता तरी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या घोडेबाजारातून बाजूला सरकत राज्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करायला हवेत,” अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.