निवडणूक आयोगानं शेण खाल्लं, सुनावणीनंतर संजय राऊतांचा घणाघात

निवडणूक आयोगाने निष्पक्षतेचा बुरखा पांघरून बेकायदेशीर गटाला मान्यता दिली असून हा संविधानावर हात ठेवून केलेला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.
बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली
तसेच, निवडणूक आयोगाने शेण खाल आहे. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. देशाच्या संविधानावर हात ठेवून हा भ्रष्टाचार करण्यात आला, असा गंभीर आरोपही यावेळी राऊतांनी केला. निवडणूक आयोगाने बेकायदेशीर मार्ग तयार केला. त्या मार्गाच्या आधारे निर्णय घेण्यात आला आणि बेकायदेशीर गटाला पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली. त्यांनाही चिन्ह देण्यात आले, असाही दावा त्यांनी केला.
न्यायालयातील कामकाजाविषयी माहिती देताना संजय राऊत म्हणाले, "आजचा संपूर्ण युक्तिवाद हा निवडणूक आयोगाने केलेल्या प्रत्येक बेकायदेशीर कृत्यावर केंद्रित होता. संविधानानुसार निष्पक्षपणे काम करण्याची जबाबदारी असलेल्या आयोगाने शिवसेनेच्या बाबतीत अत्यंत पक्षपाती निर्णय घेतला. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात मांडलेल्या पुराव्यांमुळे आणि युक्तिवादामुळे खंडपीठाचे समाधान झाले आहे, असा आम्हाला विश्वास आहे. आमच्यावर उघडउघड अन्याय झाला आहे."
‘अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना घाई का केली?’
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना राऊत म्हणाले, "हा निर्णय आधीच ठरलेला होता आणि त्यासाठी फार मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते. निकाल आधीच निश्चित झाला होता आणि त्यानंतर हे लोक गुवाहाटीला गेले. आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाबाबत घाईघाईने निर्णय देणे अपेक्षित नव्हते. ईडी (ED) आणि सीबीआयचा (CBI) वापर करून आमदार कसे वळवण्यात आले, यावरही सिब्बल यांनी न्यायालयात सविस्तर प्रकाश टाकला आहे."
‘निवडणूक आयोग भाजपचा एजंट’
आपला न्यायव्यवस्थेवर ठाम विश्वास असल्याचे सांगताना राऊत शेवटी म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या शिरोभागी 'यतो धर्मस्ततो जयः' (जिथे धर्म तिथे विजय) असे लिहिले आहे. निवडणूक आयोग सध्या भाजपचा एजंट म्हणून काम करत असला, तरी शेवटी विजय सत्याचाच होईल. मूलतः पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल असा पूर्ण विश्वास असून, मंगळवारीही आमचाच युक्तिवाद पुढे सुरु राहील."




