कोल्हापुरात 'आवास प्लस २०२४' चे सर्वेक्षण पूर्ण; १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत लाभार्थी यादीला मिळणार मंजुरी!
कोल्हापूर/प्रतिनिधी: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १,०२९ ग्रामपंचायतींमधील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांचे 'आवास प्लस २०२४' सर्वेक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणात १,३६,२३८ कुटुंबांची नोंद झाली आहे. तालुका स्तरावर तपासणी करून प्राप्त झालेली मसुदा प्रतिक्षा यादी (Draft Waiting List) सध्या ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करण्यात आली असून, आगामी १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या विशेष ग्रामसभांमध्ये या यादीला अधिकृत मान्यता दिली जाणार आहे.

तालुकानिहाय सर्वेक्षणाची आकडेवारी (पहा तुमच्या तालुक्यात किती कुटुंबे?
* *करवीर:* १७,२६८
* *राधानगरी:* १४,९१०
* *पन्हाळा:* १३,४६५
* *भुदरगड:* १३,४५०
* *शिरोळ:* १३,२४४
* *कागल:* १२,७९८
* *हातकणंगले:* १२,५०८
* *गडहिंग्लज:* १०,२९०
* *शाहुवाडी:* १०,०२८
* *चंदगड:* ८,९९६
* *आजरा:* ७,८९१
* *गगनबावडा:* २,१८८
???? *एकूण:* *१,३६,२३८ कुटुंबे*
कोणाला मिळणार प्राधान्य? (समावेशाचे निकष)
या योजनेअंतर्गत समाजातील अत्यंत गरजू घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे:
* बेघर व कच्च्या घरात राहणारी कुटुंबे
* निराधार कुटुंबे व भिक्षेकरी
* दिव्यांग व्यक्ती आणि हाताने मैला उचलणारे
* आदिम जमाती समूह
* कायद्याने मुक्त केलेले वेठबिगार
'हे' १० निकष असणारे नागरिक घरकुल योजनेतून अपात्र ठरतील:
पक्के घर किंवा २ पेक्षा जास्त खोल्या असणाऱ्यांव्यतिरिक्त खालील १० निकषांपैकी एकही निकष लागू झाल्यास संबंधित कुटुंब अपात्र ठरेल:
1. ३/४ चाकी वाहन असणारे कुटुंब.
2. यांत्रिकीकृत ३/४ चाकी कृषी उपकरणे असणारे कुटुंब.
3. ५०,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा असलेले किसान क्रेडिट कार्डधारक.
4. कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असल्यास.
5. नोंदणीकृत बिगरकृषी उद्योग असणारे कुटुंब.
6. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे मासिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास.
7. आयकर (Income Tax) भरणारे कुटुंब.
8. व्यावसायिक कर (Professional Tax) भरणारे कुटुंब.
9. २.५ एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन असणारे कुटुंब.
10. ५ एकर किंवा त्याहून अधिक जिरायती जमीन असणारे कुटुंब.
पारदर्शकतेसाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर
कोल्हापूर जिल्ह्यातील एकही पात्र आणि बेघर कुटुंब या योजनेपासून वंचित राहू नये आणि कोणत्याही अपात्र घटकाला लाभ मिळू नये, यासाठी ही प्रणाली पूर्णपणे पारदर्शक व डिजिटल पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा वापर करून राबविली जात आहे." - मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (कोल्हापूर जिल्हा परिषद)
१५ ऑगस्ट २०२६ च्या ग्रामसभेमध्ये आवास प्लस सर्वेक्षण अंतर्गत घरकुल लाभार्थी याद्यांना मान्यता दिल्यानंतर जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टानुसार नवीन लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात येईल. सर्व संबंधित लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा. - मा. अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा परिषद




