दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, ‘देवाने माझ्या गाडीत बसावं, ही इच्छा होती.
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे ज्या ठिकाणी जात आहेत, तिथे जेसीबीमधून पुष्पवृष्टी करत किंवा अशाच भव्य पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जात आहे.मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या या दौऱ्यात आणखी एक गोष्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ती म्हणजे त्यांच्या प्रवासासाठी वापरली जाणारी आलिशान डिफेंडर कार. ही डिफेंडर सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही डिफेंडर कार आपली नसून, मराठा समाजातील एका व्यक्तीने त्यांना वापरण्यासाठी दिल्याचं स्पष्ट केलं.नवीन गाडी घेतल्यानंतर आपण देवाच्या दर्शनाला जातो. मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी देवासमान आहेत. त्यांनी आमच्या समाजासाठी देवापेक्षाही मोठं काम केलं आहे. त्यांनी माझ्या गाडीत बसावं, अशी माझी इच्छा होती. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या मागे लागलो आणि गाडी त्यांना वापरायला दिली, असं सुभाष भोसले यांनी सांगितलं.
मराठा समाजासाठी आंदोलनं आणि उपोषणं करताना मनोज जरांगे यांची तब्येत खूप खालावली आहे. त्यातच ते पुन्हा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचं समजलं. त्यामुळे मी डिफेंडर गाडी खरेदी केली.या गाडीत पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी बसावं, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे पंढरपूरमधील सरकोली येथील सभेनंतर आपण त्यांना ही गाडी वापरण्यासाठी दिली. या गाडीतील सुविधांमुळे मनोज जरांगे यांचा प्रवासातील त्रास काही प्रमाणात कमी व्हावा, हीच आपली भावना असल्याचं भोसले यांनी सांगितलं.
या डिफेंडर कारची किंमत सुमारे 1 कोटी 90 लाख रुपये असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याची माहिती सुभाष भोसले यांनी दिली.गाडीवर अनेक लोक चढतील-उतरतील आणि त्यामुळे तिची अवस्था खराब होऊ शकते, याची जाणीव असूनही त्याबद्दल आपल्याला कोणतीही चिंता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“मला व्यवसायामुळे समाजासाठी तेवढा वेळ देता येत नाही. त्यामुळे समाजासाठी झटणाऱ्या माणसाला फुल नाही, तर फुलाची पाकळी म्हणून मदत करावी,” या भावनेतून आपण हे केल्याचं सुभाष भोसले यांनी सांगितलं.सुभाष भोसले हे सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील रहिवासी असून त्यांचा सराफाचा व्यवसाय आणि शेती आहे. त्यांच्याकडे सुमारे 10 एकर ऊसाची शेती असल्याची माहिती आहे.त्यामुळे मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भव्य स्वागतासोबतच ही आलिशान डिफेंडर कारही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.




