कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ अटक
मुंबई (प्रतिनिधी) : देशातील नावाजलेल्या आणि कार्यक्षम पोलीस दलांमध्ये समावेश असलेल्या मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला धक्का देणारी घटना समोर आली आहे. ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल किरण इंदुलकर असे त्याचे नाव आहे.मालवणी पोलिसांनी ड्रग्ज खरेदी करताना किरण इंदुलकर याला रंगेहाथ पकडले. किरण इंदुलकर सध्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. यापूर्वी तो मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तो ड्रग्जच्या व्यवहारात सहभागी असल्याचा संशय पोलिसांना होता.

त्यानुसार मालवणी पोलिसांनी सापळा रचला. यावेळी किरण इंदुलकर याला एमडी (मेफेड्रोन) खरेदी करताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस दलातीलच एका कर्मचाऱ्याचा अमली पदार्थांच्या प्रकरणात सहभाग समोर आल्याने मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.किरण इंदुलकर हा बीडीडी नायगाव परिसरातील रहिवासी आहे. तो यापूर्वी मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यामुळे त्याला या परिसरातील ड्रग्ज नेटवर्कची माहिती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मालवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना किरण इंदुलकर हा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आल्याचा संशय होता. त्याच्याबाबत आधीपासूनच संशय असल्याने संबंधित तपास यंत्रणांच्या रडारवर तो होता.यापूर्वीही किरण इंदुलकर याच्याविरोधात तक्रारी आल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी त्याला ताकीद देऊन बदली करण्यात आली होती. तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली होती.
आता ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इंदुलकरला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालवणी पोलिसांकडून सुरू आहे.दरम्यान, मालवणी पोलिसांना परिसरातील गेट क्रमांक 8 जवळ ड्रग्जचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला आणि एका पोलिसाला अमली पदार्थ विक्रेता म्हणून उभं केलं.
यावेळी किरण इंदुलकर तिथे आला. त्याने 15 हजार रुपयांना चार ग्रॅम एमडी खरेदी केल्याची माहिती आहे. व्यवहार पूर्ण होताच पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं.मात्र, सुरुवातीला तो पोलीस कॉन्स्टेबल असल्याची माहिती पोलिसांना नव्हती. नंतर त्याची ओळख समोर आल्यानंतर संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत जातो आणि इंदुलकरसोबत आणखी कोणाचा संबंध आहे का, याकडे लक्ष लागलं आहे.




