मी कोणाच्या दारात गेले नाही! राज्यसभा तिकिटाच्या चर्चांवर नवनीत राणांचा जोरदार खुलासा
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यसभेच्या तिकिटावरून सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता माजी खासदार नवनीत राणा यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी आपण कोणाच्याही दारात तिकीट मागण्यासाठी गेलो नसल्याचा ठाम दावा केला.

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली आणि त्यांची बिनविरोध निवड झाली.यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, मी राज्यसभेच्या तिकिटासाठी कोणाच्या दारात गेले नाही. 2024 च्या निवडणुकीतही तिकीट मागण्यासाठी कुणाकडे गेले नव्हते. मी इतकी कमजोर नाही की पदासाठी कोणासमोर जाईन. माझी विचारधारा कधीही सोडणार नाही.
यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले. तसेच, पदापेक्षा विचार महत्त्वाचे असल्याचे सांगत आगामी निवडणुकांसाठी आपण पूर्ण तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लोकसभेच्या आगामी निवडणुकीवरही त्यांनी भाष्य करत, मी पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज आहे. येणारा काळ आपलाच असेल आणि जनतेच्या विश्वासासाठी शेवटपर्यंत लढत राहीन,असा विश्वास व्यक्त केला.
नवनीत राणा यांच्या या वक्तव्यानंतर राज्यसभेच्या तिकिटावरून सुरू असलेल्या चर्चांना नवे वळण मिळाले असून, त्यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




