आरोग्य विभागातील रिक्त पदे अन् पदोन्नतीला मिळणार वेग; आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत 'हे' मोठे निर्देश
मुंबई: सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे, रखडलेली पदभरती आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पदोन्नतीच्या प्रक्रियेला आता मोठी गती मिळणार आहे. "नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही," असा कडक इशारा देत सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पदभरती आणि पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत.

आरोग्य भवन येथे आयोजित आस्थापना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी फाईलचा प्रवास जलद करून प्रत्येक स्तरावर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले.
कारभारात पारदर्शकता अन् गतिमानता आणण्याचे निर्देश
आरोग्यमंत्र्यांनी बैठकीत विविध संवर्गांतील रिक्त पदे, प्रलंबित पदोन्नती आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, "आरोग्य यंत्रणेला आवश्यक असलेले मनुष्यबळ वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी पदभरतीची प्रक्रिया विनाकारण लांबवता कामा नये. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, मात्र कामात हलगर्जीपणा किंवा आळस करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल."
पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवू नका
बैठकीत अधिपरिचारिका (नर्सिंग) संवर्गातील कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी (Probation Period), त्यांच्या पदोन्नती आणि इतर सेवाविषयक अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांना सेवाकालात योग्य संधी आणि वेळेत पदोन्नती मिळणे हा त्यांचा हक्क आहे, त्यामुळे पदोन्नतीचे प्रस्ताव विनाकारण प्रलंबित न ठेवता ते जलदगतीने मार्गी लावावेत, असे निर्देश आबिटकर यांनी दिले.
तसेच, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या (THO) कर्तव्य व जबाबदाऱ्या निश्चित करणे आणि जिल्हा हिवताप अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीने नियुक्ती देण्याबाबतच्या कार्यवाहीचाही त्यांनी या बैठकीत आढावा घेतला.




