कंगना रणौतच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; जेन-झी आणि त्यांच्या पालकांबाबत काय म्हणाली?

कंगना रणौतच्या नव्या वक्तव्याने पुन्हा वाद; जेन-झी आणि त्यांच्या पालकांबाबत काय म्हणाली?

मुंबई (प्रतिनिधी) : भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर आजच्या तरुणींविषयी केलेल्या पोस्टनंतर आता तिने जेन-झी पिढी आणि त्यांच्या पालकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

यापूर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर कंगनाने काही तरुणींवर टीका करत त्यांना "जनरेशन गटर" असे संबोधले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना तिने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.

कंगना म्हणाली, हे कशाप्रकारचे विद्यार्थी आहेत? ते अत्यंत अश्लील भाषा वापरतात. भविष्यात त्यांना न्यायालयीन मदतीची गरज भासली तर त्यांचे पालक तो खर्च करू शकतील का? आम्ही १६ वर्षांचे असतानाच स्वतःचे करिअर घडवत होतो आणि कधीही आई-वडिलांवर ओझे झालो नाही.

तिने पुढे असेही म्हटले की, भारतीय समाजात अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक परिणामांना सामोरे जावे लागू शकते. अशा प्रकारचे वर्तन स्वीकारार्ह नसल्याचेही तिने स्पष्ट केले.

यापूर्वीच्या पोस्टमध्ये कंगना रणौतने काही तरुणींवर पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव असल्याची टीका करत, शिक्षण, जबाबदारी आणि आर्थिक स्वावलंबनाबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. तिच्या या वक्तव्यांनंतर सोशल मीडियावर समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.