“महावतार नरसिंह” ऑस्कर शॉर्टलिस्टमध्ये ; भारतीय ॲनिमेशनसाठी अभिमानाची बाब
मुंबई - २०२६ च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म श्रेणीसाठी पात्र चित्रपटांची यादी जाहीर झाली असून भारतीय चित्रपट “महावतार नरसिंह” यामध्ये स्थान मिळाले आहे. अकादमीने जारी केलेल्या अधिकृत अपडेटनुसार हा चित्रपट या श्रेणीत अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय चित्रपटांसोबत स्पर्धा करणार आहे. ३४ चित्रपटांमधून निवड झाल्याने ही भारतासाठी विशेष अभिमानाची बाब ठरली आहे. आता हा चित्रपट अंतिम नामांकन मिळवतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्लेम प्रॉडक्शन्स आणि होम्बाले फिल्म्सचा “महावतार नरसिंह” हा चित्रपट राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. आता त्याने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत ९८ व्या अकादमी पुरस्कारांतील सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्मच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवले असून चाहत्यांमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.
अश्विन कुमार दिग्दर्शित या चित्रपटाची निवड के - पॉप डेमन हंटर्स, झूटोपिया २, डेमन स्लेअर : किमेत्सु नो यायबा इन्फिनिटी कॅसल आणि इतर अनेक उल्लेखनीय चित्रपटांमध्ये झाली आहे. या श्रेणीसाठी पात्र होण्यासाठी चित्रपटाची लांबी ४० मिनिटांपेक्षा जास्त आणि त्यातील किमान ७५% भाग ॲनिमेटेड असणे आवश्यक असते.
जुलै २०२५ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर “महावतार नरसिंह”ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत अंदाजे ₹३२५ कोटींची जागतिक कमाई केली व सर्वाधिक कमाई करणारा भारतीय ॲनिमेटेड चित्रपट म्हणून विक्रम प्रस्थापित केला.
दरम्यान, धर्मा प्रॉडक्शनचा “होमबाउंड” हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत भारताच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशासाठी निवडला गेला होता. “महावतार नरसिंह” हा महाअवतार सिनेमॅटिक युनिव्हर्समधील पहिला चित्रपट असून या मालिकेत सात चित्रपटांचा समावेश आहे. मालिकेतील पुढील चित्रपट “महावतार परशुराम” २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे.




