प्राजक्त तनपुरेंवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
मुंबई (प्रतिनिधी) : राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ३ मे रोजी भाजपात प्रवेश केला. राहुरीचे नगराध्यक्ष आणि आपल्या कार्यकर्त्यांसह तनपुरे यांनी भाजपात पक्षप्रवेश करत कमळ हाती घेतले. प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत. त्यांना पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील यांच्यासंदर्भात विचारले असता, माझं गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं शेवटचं राजकीय बोलणं हे राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळेसच झालं असावं. पण, राजकीय विषयावर त्यानंतर मी काही चर्चा केली नाही, असे प्राजक्त यांनी सांगितले होते. त्यानंतर आज बुधवारी,दि ३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर भाष्य केलं असून आमचं बोलणं झालं असतं तर त्यांचा भाजपमधील प्रवेश टळला असता असंही जयंत पाटलांनी म्हटलंय.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटलांना प्राजक्त तनपुरे यांच्याशी पक्षप्रवेशाबद्दल काही बोलणं झालं होतं का? असा प्रश्न विचारताच जयंत पाटील म्हणाले, माझं बोलणं झालं असतं तर प्रवेश टळला असता. माझं काहीही बोलणं झालं नाही. त्यांनी प्रवेश केला त्यांनी त्यांचा विचार करून पक्षप्रवेश केला असेल. त्यांचा जिल्हा वेगळा आहे. त्यांचा अधिकार आहे, ते आमदार राहिले आहेत. मंत्री राहिले आहेत. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काय बोलावं, त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल माझं काही बोलणं झालं नव्हतं असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
तर प्राजक्त तनपुरे यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की जयंत पाटील यांनी देखील विचार करावा भाजपमध्ये नव्या लोकांना संधी मिळते आणि पद देखील मिळते, यावर जयंत पाटील म्हणाले ते रावसाहेब दानवे बोललेत ती त्यांची मनीषा आहे, मी त्यांच्या प्रतिक्रियांवर उत्तर देण्याचे कारण काय? असं म्हणत जयंत पाटील यांनी यावरती बोलणं टाळलं.
पक्षप्रवेशानंतर जयंत पाटील यांच्यासंदर्भात प्राजक्त तनपुरेंना विचारले असता, माझं गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्याशी बोलणं झालं नाही माझं शेवटचं राजकीय बोलणं हे राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळेसच झालं असावं. पण, राजकीय विषयावर त्यानंतर मी काही चर्चा केली नाही, असे प्राजक्त यांनी सांगितले. तसेच, माझ्या भाजप प्रवेशाचा आणि त्यांच्या राजकीय समीकरणाचा काही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही नातेवाईक असलो ते मामा असले, मी भाचा असलो तरी आमच्या दोघांच्या मतदारसंघाचे राजकीय समीकरण वेगवेगळे आहेत, त्यांची राजकीय उंची खूप मोठी आहे. माझ्या प्रवेशाचा त्यांच्या राजकारणाशी कुठला संबंध नाही, असे म्हणत जयंत पाटील यांच्यासंदर्भात तनपुरे यांनी आपल्या भावना मांडल्या होत्या.




