पंढरपुरात वारकऱ्यांची विक्रमी गर्दी! दर्शन रांग तब्बल 8 किमी, आषाढीपूर्वीच सर्व विक्रम मोडले
मुंबई (प्रतिनिधी) : अवघ्या दोन दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली असून पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. आज नवमीच्या दिवशीच विठ्ठलाच्या दर्शनासाठीची रांग मंदिरापासून तब्बल 8 किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. हजारो वारकरी अजूनही दर्शनासाठी येत असून, दर्शन मंडप भरल्यानंतरही रांग सातत्याने वाढत आहे.

काल रात्री वाढत्या गर्दीमुळे आणखी 3 किलोमीटरची रांग वाढवावी लागली होती. मात्र आज त्याही पुढे भाविकांची संख्या वाढल्याने प्रशासनाला आणखी व्यवस्था करावी लागत आहे. यंदा आधी भाविक येत आहेत आणि त्यानंतर रांग वाढवण्याची वेळ प्रशासनावर येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदाची आषाढी एकादशी 25 जुलै रोजी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने भाविकांसाठी तब्बल 12 लाख बुंदी लाडू तयार केले असून, गरज पडल्यास ही संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लाडूंची गुणवत्ता अन्न व औषध प्रशासनाकडून तपासण्यात आली आहे.
दरम्यान, पालखी मार्गावर उभारण्यात आलेले विशाल जर्मन हँगर मंडप वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहेत. येथे स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा, पायांची मसाज सेवा, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, चेंजिंग रूम आणि हिरकणी कक्ष अशी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रात्री भजन-कीर्तनासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यंदा वारकऱ्यांसाठीच्या सुविधा दुप्पट करण्यात आल्या असून, पंढरपूरकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.




