संघ कार्यक्रमावरून उठलेल्या वादावर विश्वास नांगरे पाटलांचे स्पष्टीकरण; “सेवा नियमांचे कोणतेही उल्लंघन नाही”
मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावर IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी पहिल्यांदाच स्पष्ट भूमिका मांडली आहे. नागपूरचे नवे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या टीकेला उत्तर दिले.

नांगरे पाटील म्हणाले की, त्या कार्यक्रमात सहभागी होणे हे त्यांच्या सेवा शर्तींचे कोणतेही उल्लंघन नाही. “मी गेल्या 30 वर्षांपासून पोलीस सेवेत आहे. विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो. त्यामुळे या कार्यक्रमालाही मी त्याच दृष्टीने उपस्थित होतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.त्यांनी पुढे सांगितले की, नागपूरमध्ये कायदा-सुव्यवस्था राखणे, महिला आणि लहान मुलांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे त्यांचे प्रमुख प्राधान्य असेल. “IPS मधील ‘S’ म्हणजे Service आहे, म्हणजे लोकसेवा,” असेही त्यांनी नमूद केले.
संघ कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीवर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, त्या कार्यक्रमात GST, आध्यात्मिक मार्गदर्शन आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली होती. तसेच त्यांनी सामूहिक प्रार्थना आणि सामाजिक विषयांवर भाषण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांगरे पाटलांवर टीका करत त्यांना थेट संघ किंवा राजकीय क्षेत्रात जाण्याचा सल्ला दिला होता.या संपूर्ण वादानंतर नांगरे पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट करत कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.




