हायव्होल्टेज पोटनिवडणुकांत भाजपला धक्का? बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर आघाडीवर, दतियात काँग्रेस पुढे
मुंबई (प्रतिनिधी) : देशातील दोन महत्त्वाच्या पोटनिवडणुकांच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला धक्का बसताना दिसत आहे. बिहारच्या बांकीपूरमध्ये जनसुराजचे प्रशांत किशोर आघाडीवर आहेत, तर मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली आहे.

मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा पोटनिवडणुकीच्या पाचव्या फेरीअखेर काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह 308 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांनी आपण 12 ते 15 हजार मतांनी विजय मिळवू, असा दावा केला आहे. दुसरीकडे, भाजपचे ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ निश्चित मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सहकारी ग्रामीण विकास बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर दतिया विधानसभा जागा रिक्त झाली होती. 2023 च्या निवडणुकीत त्यांनी तत्कालीन गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांचा 7,742 मतांनी पराभव केला होता.
मतदानानंतर काँग्रेसमध्येही मोठी घडामोड झाली. पक्षाने माजी आमदार राजेंद्र भारती यांना प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले. काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांनी पक्षविरोधी काम आणि निवडणुकीत घातपात केल्याचा आरोप करत वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती.
दरम्यान, बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा बालेकिल्ला धोक्यात आल्याचे चित्र आहे. सातव्या फेरीनंतर जनसुराजचे प्रशांत किशोर 3,811 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे नीरज सिन्हा 9,689 मतांसह दुसऱ्या स्थानावर असून, आरजेडीच्या रेखा गुप्ता मागे पडल्या आहेत. या मतदारसंघात 14 टेबलांवर 31 फेऱ्यांमध्ये मतमोजणी सुरू आहे.




