'विजयाच्या उंबरठ्यावर आलोय, घरात बसू नका'; मनोज जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन, आमरण उपोषणाला सुरुवात
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास थेट मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच आंदोलनापासून दूर राहणाऱ्या राजकीय नेत्यांनाही त्यांनी कडक शब्दांत इशारा दिला.

माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "आजपासून आमरण उपोषण सुरू केलंय. 58 लाख नोंदींचे तत्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारनं द्यावं. आता वेळ देता येणार नाही. आम्हाला गावागावातून फोन आले पाहिजेत. सरकारने आता गतीने निर्णय घ्यायचा आहे. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढले आहे, त्यांची व्हॅलिडिटी द्या. हैदराबाद गॅझेटमधील संख्येनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आम्हाला सांगतो, करतो असं म्हणायचं नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र दिले त्याची व्हॅलिडिटी द्या. सरकारला आता पळायला जागा नाही. कोणी अर्ज केला नाही म्हणून सरकारला यापासून पळता येणार नाही. औंध, पुणे, सातारा गॅझेटिअरचा जीआर लागू करा. मराठ्यांनी सरकारवर भरोसा ठेवायचा बंद करा. आपला नेता कोणी नाही," असं त्यांनी म्हटलं.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, "स्वार्थाने दुनिया भरली आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून समाजासाठी प्रामाणिकपणे लढतो आहे. सरकारने महाराष्ट्रातील सर्व केसेस मागे घ्याव्यात. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि मदत द्यावी. मराठ्यांच्या लेकरांनी आता वाट बघायची नाही. तातडीने अंतरवालीकडे वेळ मिळेल तसं यायचं आहे. हा शेवटचा लढा आहे. म्हणून मी समाजाला हाक दिली. आपण आज घराबाहेर पडलो नाही तर आपण कायम गरीब राहणार आहोत. आपल्या लढ्यामुळे पुढच्या पिढ्यांचं कल्याण होणार आहे."
"उद्यापासून मला बोलता येणार नाहीये. त्यामुळे आजच मी समाजापुढे माझं म्हणणं मांडतोय. आता आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत, आता माघार नाही. गेल्या तीन वर्षांपासून आपण लढतोय, आता हा अखेरचा लढा आहे. गाफील न राहता, घरात बसून न राहता, मुंबई असो किंवा अंतरवाली सराटी असो, आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे," असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं.
यावेळी राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींवरही जरांगे पाटील यांनी निशाणा साधला. "आपल्या गावातील कोणता राजकीय नेता आंदोलनात आला नाही, हे फक्त मला सांगा. सरपंच, सभापती, सदस्य, नगरसेवक, महापौर, जिल्हाप्रमुख, माजी-आजी आमदार, खासदार, माजी मंत्री, संस्थावाले, श्रीमंत मराठा, नोकरदार हे बाहेर पडले नाहीत तर फक्त मला सांगा. पुढच्या निवडणुकीत त्यांचा बाजार उठवणार," असा थेट इशारा त्यांनी मराठा नेत्यांना दिला आहे.




