मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाला हायकोर्टाची महत्त्वाची अट; राज्य सरकारलाही सूचना, कोर्टात नेमकं काय घडलं?

मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनाला हायकोर्टाची महत्त्वाची अट; राज्य सरकारलाही सूचना, कोर्टात नेमकं काय घडलं?

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर मुंबई हायकोर्टाने काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. सण आणि उत्सवांच्या काळात कायद्यानुसार रितसर अर्ज करून परवानगी घेणं बंधनकारक असेल, अशी प्रमुख अट न्यायालयाने ठेवली आहे. तसेच, मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यास त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी राज्य सरकारने घ्यावी, अशा सूचनाही कोर्टाने दिल्या आहेत.

 कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. मनोज जरांगे यांच्या मुंबईतील संभाव्य आंदोलनाविरोधात निलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मागील आंदोलनादरम्यान मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीचा हवाला देत आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

 मुख्य न्यायमूर्ती महेश त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी मनोज जरांगे यांना मुंबईत आंदोलन करण्यापासून रोखता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

 दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून, राज्यातील मराठा समाजाला अंतरवाली सराटीमध्ये उपस्थित राहण्याचं आवाहनही मनोज जरांगे यांनी केलं आहे.

 मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देण्यात यावी, तसेच हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारावर 2 सप्टेंबरच्या जीआरनुसार प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देऊन सातारा आणि कोल्हापूर गॅझेटिअर लागू करावं, यासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली होती.

 "सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही," असं म्हणत मनोज जरांगे यांनी मुंबई आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई आंदोलनावर ते ठाम असून, राज्यातील समर्थक मराठा आंदोलकांना आज अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

 त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे नेमकी कधी कूच करणार आणि आंदोलनाची तारीख काय असणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.