मनोज जरांगेंच्या आंदोलनापेक्षा दुष्काळाचा मुद्दा महत्त्वाचा; गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन नको, बावनकुळेंचं आवाहन
मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या परिस्थितीत मनोज जरांगे पाटील काय करतात किंवा त्यांची भूमिका काय आहे, यापेक्षा राज्यातील दुष्काळाची परिस्थिती अधिक महत्त्वाची असल्याचं मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण काहीसं कमी आहे आणि पिकं करपत आहेत. काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, आज दुपारी चार वाजता पुन्हा सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते शनिवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मुंबईतील आंदोलनामुळे मुंबईकरांसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्णय पाहता मुंबईत कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले. राज्यातील सर्व आंदोलकांना माझी विनंती आहे की, सध्याच्या काळात मुंबईत आंदोलन करणं राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. ओबीसी समाज असो किंवा मराठा समाज, कोणाचाही हक्क डावलता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
इतिहासात यापूर्वी न घेतलेले निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. तरीही या दोन्ही नेत्यांवर करण्यात येणारी टीका महाराष्ट्राला आणि समाजाला पटत नाही. आजवर मराठा समाजाला मिळालेला न्याय हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या काळात मिळाला असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं. आमचं सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत काम करत आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. मुंबई आणि महाराष्ट्रात गणेशोत्सव हा देशातील मोठा सण आहे. त्यामुळे या काळात कोणीही आंदोलन करू नये, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल आणि त्यांच्या पाठीशी कसं उभं राहता येईल, यावर सरकारचं लक्ष आहे. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, ही महत्त्वाची बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातील दुष्काळाकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आजची बैठक त्याच उद्देशाने घेण्यात आली. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी मला आणि मुख्य सचिवांना संपूर्ण राज्याचं तातडीने सर्वेक्षण सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या आहेत. सध्या असलेल्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. राज्याची संपूर्ण परिस्थिती समोर आल्यानंतर येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत हा आढावा मांडला जाईल. येत्या मंगळवारी राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार असून, संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि संपूर्ण यंत्रणा दौरा करणार आहे. आपणही काही ठिकाणी भेट देणार असून, येणाऱ्या कॅबिनेटमध्ये राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा मांडणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.




