नितिन नवीन यांच्यासह, भाजपकडून राज्यसभेसाठी ९ जणांच्या नावाची घोषणा
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपने राज्यसभेसाठी 9 नावांची पहिली यादी घोषित केली आहे. या यादीत पक्षाध्यक्ष नितिन नवीन यांच्या नावाचाही समावेश आहे. भाजपने त्यांना बिहारमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणुका होणार आहेत, मात्र, सध्या भाजपने पहिल्या यादीत केवळ नऊच नावे जाहीर केली आहेत.

महत्वाचे म्हणजे, भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार, बिहारमधील २, आसाममधील २, ओडिशातील २ आणि छत्तीसगड, हरियाणा आणि ओडिशातील प्रत्येकी एका उमेदवाराचे नावे आहेत.
भाजपने बिहारमधून नितीन नवीन आणि शिवेश कुमार, आसाममधून तेराश गोवाला आणि जगीन मोहन, छत्तीसगडमधून लक्ष्मी वर्मा यांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय, यादीत पुढे हरियाणातून संजय भाटिया, पश्चिम बंगालमधून राहुल सिन्हा आणि ओडिशामधून मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांचाही समावेश आहे.
निवडणूक आयोगानुसार, राज्यसभेच्या निवडणुका ज्या राज्यांमध्ये होणार आहेत त्यात महाराष्ट्र (७ जागा), ओडिशा (४ जागा), तेलंगणा (२ जागा), तामिळनाडू (६ जागा), छत्तीसगड (२ जागा), पश्चिम बंगाल (५ जागा), आसाम (३ जागा), हरियाणा (२ जागा), हिमाचल प्रदेश (१ जागा) आणि बिहार (५ जागा) यांचा समावेश आहे. या सर्व जागांसाठी १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी करण्यात येईल.




