मुंबईतील लोकल 100% मेट्रोसारख्या होणार; बंद दरवाजे, AC आणि आधुनिक सुविधा, सेकंड क्लासच्या भाड्यात वाढ नाही
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकर मेट्रोच्या सुविधांना पसंती देत आहेत. मात्र मुंबईची लोकल ट्रेन अजूनही जुन्या पद्धतीची आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मुंबई लोकलसाठी मेट्रोसारखे आधुनिक डबे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. 2029-30 पर्यंत मुंबईतील सर्व लोकल ट्रेन मेट्रोसारख्या करण्याचे नियोजन असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

या नव्या लोकलमध्ये बंद होणारे दरवाजे, 100 टक्के एसी, अतिशय स्वच्छ कोच, वेळेवर धावणाऱ्या ट्रेन आणि आधुनिक सिग्नलिंग सिस्टीम अशा सुविधा असतील. विशेष म्हणजे या सुविधा दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या भाड्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबईत मेट्रो सुरू झाल्यानंतर मुंबईकरांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसी, व्यवस्थित बंद होणारे दरवाजे, वेळेवर धावणाऱ्या ट्रेन आणि स्वच्छता या सुविधांमुळे मुंबईकर मेट्रोच्या प्रेमात आहेत.
मात्र दुसरीकडे मुंबईची लोकल अजूनही जुनीच आहे. लोकलमध्ये प्रवाशांना गर्दी आणि धक्के सहन करावे लागतात. दरवाजे नसल्यामुळे अनेकदा अपघात होतात आणि डब्यांची अवस्थाही फारशी चांगली नाही. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून मुंबई लोकलमध्येही मेट्रोसारखे डबे आणण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, सुरुवातीला नवीन डबे तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. मात्र पहिली ट्रेन 2030 मध्ये तयार होणार असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्याला वेग देण्याची गरज होती.
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांच्यासमोर ही समस्या मांडल्यानंतर त्यांनी तातडीने निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानुसार आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. आज आपण वंदे भारतसारखे आधुनिक कोच तयार करत आहोत. जगातील सर्वोत्तम दर्जाचे कोच तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. देशातील तीन कोच फॅक्टरीमध्ये आता मुंबई लोकलसाठीही अशाच आधुनिक कोचची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2027 च्या अखेरपासून नवीन कोच तयार करण्यास सुरुवात होईल. त्यानंतर साधारण 2029 किंवा 2030 पर्यंत मुंबईतील सर्व लोकलसह इतर ट्रेनचे कोचही मेट्रोसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याचे नियोजन आहे.या नव्या लोकलमध्ये बंद होणारे दरवाजे, 100 टक्के एसी, स्वच्छ कोच, वेळेवर धावणाऱ्या ट्रेन आणि नवीन सिग्नलिंग सिस्टीम अशा सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या प्रवासाच्या भाड्यात कोणतीही वाढ केली जाणार नाही. “एसी आम्ही देऊ, पण भाडेवाढ करणार नाही,” अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.




