शेतकरी, इथेनॉल ते साखर कारखाने! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या फायद्याचं गणित
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारचं इथेनॉल धोरण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. इथेनॉलचं उत्पादन आणि ब्लेंडिंग जर उद्या बंद केलं, तर त्याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसेल, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. “100 टक्के इथेनॉल तयार करणारा हा शेतकरी आहे,” असं फडणवीस म्हणाले. सध्या साखर कारखाने सुरू राहण्यामागे इथेनॉल ब्लेंडिंग हे महत्त्वाचं कारण आहे. जर इथेनॉल ब्लेंडिंग बंद झालं, तर साखर कारखाने शेतकऱ्यांना FRP देऊ शकणार नाहीत. तसेच कारखाने कर्जाची परतफेडही करू शकणार नाहीत आणि अनेक कारखाने बंद पडतील, असा दावा त्यांनी केला.

100 टक्के मक्याचा शेतकरी इथेनॉलकडे वळला, तर त्याला हमीभावापेक्षा अधिक पैसे मिळू शकतात, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. धान्यावर आधारित इथेनॉलची निर्मिती केली जात असून, शेतीमालापासून इंधन तयार होत आहे. आपण शेतीच्या क्षेत्रात पुढे आलो आहोत, मात्र अजूनही मोठी प्रगती करण्याची गरज आहे, असं फडणवीस म्हणाले. “इथेनॉल जर उद्या आपण बंद केलं, तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. आपण शेतीतून इंधनाकडे वाटचाल करत आहोत. यामुळे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात शाश्वतता येऊ शकते,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारात आला की त्याचा परिणाम थेट दरांवर होतो आणि भाव कमी होतात. मात्र बाजारात आवश्यकतेपेक्षा जास्त माल आला नाही, तर भाव स्थिर राहण्यास मदत होईल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.दरम्यान, नागपूरमधील प्रकल्प सुरू झाला असून त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पाही सुरू होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो देशासाठी एक मॉडेल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
इथेनॉलच्या मुद्द्यावर मोठं कॅम्पेन सुरू असल्याचं सांगत फडणवीस म्हणाले की, देशातील मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की इथेनॉलमुळे इंजिन खराब झाल्याची एक तरी केस दाखवा. मात्र अद्याप अशी एकही केस दाखवता आलेली नाही.“इथेनॉल हे प्युअर फ्युएल आहे. मात्र इथेनॉलची कॅलोरिफिक व्हॅल्यू कमी असल्यामुळे गाडीच्या अॅव्हरेजवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. सध्या इथेनॉलचं प्रमाण 20 टक्के आहे. त्यामुळे अॅव्हरेजवर होणारा परिणाम 20 टक्क्यांच्या सात टक्के इतका आहे. त्यामुळे हा परिणाम नगण्य स्वरूपाचा आहे,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
मात्र जाणीवपूर्वक इथेनॉलच्या विरोधात नॅरेटिव्ह तयार केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.“इथेनॉल जर उद्या आपण बंद केलं किंवा इथेनॉलवर अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तर सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे. 100 टक्के इथेनॉल तयार करणारा शेतकरी आहे. शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर ते कोण भरून देणार?” असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
जगभरात 50 टक्के आणि 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आहेत आणि तिथेही त्या वापरल्या जात आहेत. त्यामुळे इथेनॉलमुळे गाड्यांमध्ये अडचणी निर्माण होतील, असा दावा योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं. इथेनॉलच्या विरोधात नॅरेटिव्ह तयार करण्यामागे कोण आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. भारताने कुठल्याही क्षेत्रात प्रगती केली की काही लोकांची दुकानं बंद होतात, असा टोला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.




