टाकळी एमआयडीसी प्रश्नासाठी शरद पवारांची घेतली भेट ; उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून प्रस्ताव रद्द करण्याचे दिलेले आश्वासन

टाकळी एमआयडीसी प्रश्नासाठी शरद पवारांची घेतली भेट ; उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून प्रस्ताव रद्द करण्याचे दिलेले आश्वासन

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळी गावातील प्रस्तावित एमआयडीसीच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) शिष्टमंडळाने आज (१६ ऑगस्ट) मुंबईतील 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाकळी गावकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध एमआयडीसी लादू नये, अशी आक्रमक भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

गायरान जमिनीवर सैनिक शाळा उभारण्याची मागणी
 जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवारांचे लक्ष वेधले की, टाकळी गावातील संबंधित जमीन गायरान असून ती सैनिक शाळा व सैनिकांच्या कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरण्यात यावी. तसेच, टाकळीचा मोठा भाग पुराच्या पाण्याखाली जात असताना तेथे एमआयडीसी उभारण्याचा अट्टाहास का? असा सवालही त्यांनी केला. औद्योगिक क्षेत्र उभारायचेच असल्यास ते शिरोळ तालुक्यातील इतर उपलब्ध ५०० एकर जमिनीवर नियोजित पद्धतीने उभारावे, अशी मागणी त्यांनी केली.

शरद पवारांचे आश्वासन
 शिष्टमंडळाची बाजू ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी, "लोकभावनेचा पूर्ण आदर केला जाईल. टाकळी एमआयडीसीचा हा विवादित प्रस्ताव रद्द करण्याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून योग्य ती भूमिका मांडली जाईल," असे स्पष्ट आश्वासन दिले.

या भेटीदरम्यान पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. अनिल घाटगे, सरचिटणीस गणेश जाधव आणि प्रदेश सचिव सुनील बोगाळे उपस्थित होते.