महाराष्ट्रात २ कोटी मतदारांची नावे वगळली? रोहित पवारांच्या गंभीर दाव्याने खळबळ
मुंबई: एसआयआर (SIR) प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज (सोमवार, १७ ऑगस्ट) संपत आहे. या प्रक्रियेवरून आधीपासूनच विरोधकांकडून आक्षेप घेतला जात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)चे आमदार रोहित पवार यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतल्यानंतर एक मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. महाराष्ट्रातील तब्बल २ कोटी मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यात आल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

रोहित पवारांचे मुख्य मुद्दे व आकडेवारी:
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी वगळण्यात आलेल्या नावांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे असल्याचे सांगितले:
-
मृत मतदार: ३४ लाख
-
पत्ता न लागलेले / घरी कोणी न सापडलेले: ७६ लाख
-
कायमचे स्थलांतरित झालेले: ७७ लाख
-
माहिती देण्यास नकार दिलेले: २ लाख
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण:
ज्या लोकांची नावे वगळली आहेत, त्यापैकी मृत दाखवलेले व्यक्ती किंवा अनुपस्थित असलेले नागरिक पुन्हा 'फॉर्म ६' भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रक्रियेवर अनेक तांत्रिक आणि इतर प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचे त्यांनी नमूद केले.
-
भाजपवर सॉफ्टवेअरचा आरोप: भाजपमार्फत एक विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आल्याचा दावा करत, यात मतदारांचे 'आपल्या विचारधारेचे', 'संदिग्ध' आणि 'विरोधी' अशा तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
-
BLO वरील कामाचा ताण: मागील ३ ते ३.५ महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत शिक्षक आणि ग्राम अधिकाऱ्यांसारख्या बीएलओ (BLO) वर १०० टक्के छाननीचे अवास्तव टार्गेट लादण्यात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी बीएलओ टेबल सर्व्हे करत असून, यात भाजपचे कार्यकर्ते त्यांना माहिती पुरवत असल्याचे प्रकार पुणे, नाशिक आणि ठाणे येथे समोर आले आहेत. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.
-
पुढील भूमिका: येत्या २४ तारखेला निवडणूक आयोग प्राथमिक यादी जाहीर करणार आहे. त्यानंतर आमच्याकडील २८8 मतदारसंघांच्या याद्यांशी त्याची पडताळणी केली जाईल. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्येही अशाच प्रकारे नावे वगळण्यात आली होती, ज्यावर आम्ही काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याचे रोहित पवार यांनी शेवटी सांगितले.




