सिद्धिविनायक मंदिराचा महाकाल मंदिराच्या धर्तीवर विकास; 500 कोटींच्या निधीतून एक रुपयाही घेणार नाही – सदा सरवणकर

सिद्धिविनायक मंदिराचा महाकाल मंदिराच्या धर्तीवर विकास; 500 कोटींच्या निधीतून एक रुपयाही घेणार नाही – सदा सरवणकर

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराचा विकास आणि परिसराचे सुशोभीकरण उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी दिली. या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेकडून ५०० कोटी रुपयांचा निधी आरक्षित करण्यात आला असून, हा निधी थेट सिद्धिविनायक न्यासाकडे न जाता महापालिकेमार्फत विविध विकासकामांवर खर्च केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिद्धिविनायक मंदिर परिसरातील सुशोभीकरण आणि विकासकामांबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत सरवणकर बोलत होते. त्यांनी सांगितले की, मंदिर परिसरातील विकासकामे टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, आरक्षित निधीतील सर्व रक्कम खर्च होईलच असे नाही.

सरवणकर म्हणाले की, मंदिर परिसराच्या विकासासंदर्भात सुरू असलेल्या कामांना काही मंडळींकडून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, परिसरातील रहिवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी यापूर्वीच प्रयत्न करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळापासून या प्रकल्पाबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकांमध्ये ५०० कोटी रुपयांचा निधी सिद्धिविनायक न्यासाला दिला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करत सरवणकर म्हणाले की, शासन आणि महापालिकेकडून उपलब्ध करून दिलेला निधी संबंधित विकासकामांसाठी महापालिकेमार्फत खर्च केला जाईल. हा निधी थेट न्यासाच्या खात्यात जमा होणार नाही.

राज्यातील अनेक देवस्थानांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याच धर्तीवर सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करण्यात आला असून, सर्व खर्च निर्धारित प्रशासकीय प्रक्रियेनुसार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.