काँग्रेसचा महिला आरक्षणात विनाकारण खोडा; अशोक चव्हाणांची टीका

काँग्रेसचा महिला आरक्षणात विनाकारण खोडा; अशोक चव्हाणांची टीका

दिल्ली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र्र काँग्रेसने केलेल्या टीकेवर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आपण कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही, परंतु काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये खोडा घालण्याचं कारण नव्हतं असं अशोक चव्हाण म्हणाले. तसेच लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत. ते आता सुटसुटीत केले पाहिजेत यात गैर काय? मतदारसंघांमध्ये समानता आणली पाहिजे, असं अशोक चव्हाण म्हणाले. 

मला मान्य आहे की काँग्रेसच्या काळात महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय झाला, ते कुणी नाकारत नाही. पण आता जे महाभाग माझ्यावर टीका करतात, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की माझी टीका वैयक्तिक नाही. महिला आरक्षणाच्या विधेयकात काल विनाकारण विरोधकांनी खोडा घातला. त्याचं काहीही कारण नव्हतं, असं अशोक चव्हाण म्हणाले. 

अशोक चव्हाण म्हणाले की, "अमित शाह यांनी प्रत्येक प्रश्नावर स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधकांनी सांगितलेल्या सुधारणा करायलाही ते तयार होते. सरकारची सगळी राजकीय तयारी केली, सर्व स्पष्ट केलं. मतदारसंघ पुनर्रचनेतून दक्षिण भारतातील जागा कमी होत नाहीत हे स्पष्ट केलं. मग त्याला दोन तृतीयांश बहुमताने पास करण्यासंदर्भात विरोधकांच्या मदतीची आवश्यक होती. महिला आरक्षणाचा महत्वाचा भाग होता. पण या निर्णयाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून अडवणूक केली."

अशोक चव्हाण म्हणाले की, "अनेक राज्यांत कांग्रेसची 20-20 वर्षे झाली, तरी सरकारं नाहीत. अनेक राज्यात काँग्रेसकडे खाली केडर शिल्लक नाही. महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. केंद्रीय नेतृत्वाला याच्याशी काही घेणेदेणे नाही. काँग्रेसला काहीही भवितव्य नाही, त्यामुळे त्यांच्यातील अनेक नेते हे भाजपमध्ये यायला तयार आहेत."

अशोक चव्हाण म्हणाले की, "मी भाजपमध्ये असलो तरीही काँग्रेसच्या विरोधात मुद्यांवर बोलतो. सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे, काँग्रेसकडे काही मुद्दाच राहिला नाही. मी काँग्रेस सोडल्यामुळे काही लोकांना चागलं वाटतं, कारण मी गेल्याने त्यांना संधी मिळाली. काही लोक खासगीमध्ये सांगतात की भाजपमध्ये यायचं आहे. किती दिवस विरोधात रहायचं असं बोलतात."