महाराष्ट्रात १२०० एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ; निर्यातीला नवी गती
मुंबई (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याचे मत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केले. शेतीमालाला अधिक भाव मिळावा यासाठी पीक काढणीनंतरची संपूर्ण साखळी मजबूत केली जाणार आहे. कोल्ड स्टोरेज, गोदामे, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि निर्यात व्यवस्था बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारपेठा विकसित करण्याचा सरकारचा मानस असल्याचे रावल म्हणाले. भविष्यात सुमारे 1100 ते 1200 एकर क्षेत्रावर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले.

या बाजारपेठेद्वारे महाराष्ट्रातील शेतीमाल जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे रावल म्हणाले. एअरपोर्ट, सीपोर्ट, कंटेनर पोर्ट, रेल्वे आणि महामार्गाशी जोडलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याची संकल्पना आहे. देशातील प्रभावी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि उन्नतीकरण करण्यात येणार आहे. अनुभवी अधिकारी, माजी संचालक, माजी अध्यक्ष आणि क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कामकाज केले जाणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड शेतकऱ्यांची पिळवणूक आणि कथित भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचे ते म्हणाले.




