जयंत पाटील यांच्या आरोपांनी सुरेश धस भडकले! दूध प्रकरणातून नवा राजकीय वाद
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कथित दूध भेसळ आणि दूध संकलनातील गैरव्यवहाराचा मुद्दा आता मोठ्या राजकीय संघर्षात बदलला आहे. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी नाव न घेता बीडमधील एका आमदाराच्या पत्नीवर गंभीर आरोप केले. या वक्तव्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी संतप्त प्रतिक्रिया देत थेट जयंत पाटलांनाच इशारा दिला.

जयंत पाटील यांनी सभागृहात दावा केला की, बीडमधील एका आमदाराच्या पत्नीमार्फत डेअरी चालक आणि दूध संकलन संस्थांवर दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. निकृष्ट दर्जाचे दूध स्वीकारण्यासाठी मोठ्या दूध प्रक्रिया कंपन्यांवरही दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली.
याशिवाय, या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध करणाऱ्या एका माध्यम संस्थेवर दबाव टाकला जात असल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. संबंधित आमदाराची पत्नी संपादकांना फोन करून दबाव आणत असल्याचे ऐकिवात असल्याचा दावा करत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मात्र, या सर्व आरोपांमध्ये जयंत पाटील यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. तरीही या वक्तव्याचा रोख आपल्याकडे असल्याचे मानत सुरेश धस यांनी जोरदार पलटवार केला. माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, "जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी सहज डिवचायचा माणूस नाही. मी उलटा फिरलो तर तुम्हालाही सोडणार नाही. तुमची दादागिरी तिकडे चालेल, बीडमध्ये नाही."
धस यांनी पुढे आणखी आक्रमक भूमिका घेत, "बाकीचे लोक गप्प बसत असतील, पण आम्ही गप्प बसणार नाही. तुम्ही आमच्या भागात येऊन आरोप करणार असाल, तर आम्हीही तुमच्या भागात जाऊन उत्तर देऊ," असे स्पष्ट केले.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील जलसंपदा विभागाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. 'जिओ टॅगिंग'च्या नावाखाली मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, पुढील अधिवेशनात यासंदर्भातील माहिती सभागृहात मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच 'महालक्ष्मी' नावाच्या संस्थेचा उल्लेख करत, तिचे रजिस्ट्रेशन, संचालक आणि आर्थिक व्यवहारांची माहितीही पुढील अधिवेशनात उघड करणार असल्याचा दावा त्यांनी केला.दूध प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सुरेश धस म्हणाले की, आमचा व्यवसाय कोणाला धमकावण्याचा नाही. माझ्या पत्नीने कोणालाही फोन करून दबाव आणल्याचा आरोप खोटा आहे. ज्यांनी असा दावा केला आहे त्यांनी समोर येऊन पुरावे द्यावेत आणि एफआयआर दाखल करावा. त्यानंतर सत्य बाहेर येईल.
दरम्यान, दूध भेसळ प्रकरण, जिओ टॅगिंगवरील आरोप आणि 'महालक्ष्मी' संस्थेचा मुद्दा यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. आगामी अधिवेशनात या विषयावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.




