उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना कल्याण कोर्टाचे समन्स; 2009 च्या निवडणूक प्रकरणात हजर राहण्याचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले आहेत. न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना 5 ऑगस्ट, तर एकनाथ शिंदे यांना 6 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे प्रकरण 2009 च्या कल्याण लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. त्यावेळी आनंद परांजपे यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणुकीबाबत आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते.
मात्र, वसंत डावखरे यांनी हा व्हिडिओ संपादित करून आपली बदनामी केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी आता दोन्ही नेत्यांना न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहेत.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते ॲड. हर्षल प्रधान यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, हे केवळ उद्धव ठाकरे यांनाच नव्हे, तर एकनाथ शिंदे यांनाही बजावलेले समन्स आहेत. हे जुने राजकीय प्रकरण असून त्याकडे अनावश्यक गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. मात्र न्यायालयाचा आदर राखत कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊ, असे म्हटले आहे.




