मोदींच्या वाढदिवसापासून महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात 12 उपक्रमांचा धडाका!

मोदींच्या वाढदिवसापासून महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात 12 उपक्रमांचा धडाका!

मुंबई  प्रतिनिधी   -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांच्या कार्यकाळाचे औचित्य साधत केंद्र सरकारकडून यंदा विशेष ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येणार आहे. 17 सप्टेंबरपासून सुरू होणारे हे अभियान तब्बल महिनाभर चालणार असून 17 ऑक्टोबरपर्यंत देशभर विविध सेवाभावी आणि जनकल्याणकारी उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत या अभियानाची घोषणा केली. भाजपसह एनडीएतील घटक पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून हे अभियान व्यापक स्वरूपात राबवले जाणार असल्याचे शाह यांनी सांगितले.



यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून ‘सेवा सप्ताह’ आयोजित केला जात होता. मात्र, यंदा या उपक्रमाचा कालावधी वाढवून तब्बल एक महिना करण्यात आला आहे. देशातील प्रत्येक राज्य, केंद्रशासित प्रदेश, जिल्हा, लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्राच्या पातळीपर्यंत हे अभियान पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अमित शाह यांच्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर 2026 रोजी नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाचे पंतप्रधान असा 25 वर्षांचा सार्वजनिक सेवेचा प्रवास पूर्ण होत असल्याने यंदाचे अभियान विशेष महत्त्वाचे असल्याचे शाह यांनी म्हटले.

देशभरात कोणते उपक्रम होणार?

सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत विविध सामाजिक आणि लोककल्याणकारी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये रक्तदानापासून सरकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

अभियानातील प्रमुख 12 उपक्रम :

रक्तदान अभियान

आभार कार्यक्रम

नमो सेवा उपक्रम

संगीत व नाट्यमय प्रस्तुती

अंगणवाडी सेवा

सेवा ज्योती कलश यात्रा

वडनगर ते वाराणसी यात्रा

वाराणसी ते वडनगर यात्रा

सेवा सेतू अभियान

ब्लॉक व तालुका स्तरावर सरकारी योजनांचा प्रसार

विविध जनसेवा आणि लोकसहभागाचे उपक्रम

सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे अभियान

प्रत्येक बूथपर्यंत पोहोचणार अभियान

‘सेवा संकल्प अभियान’ केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित न ठेवता गावपातळीपासून बूथपर्यंत नेण्याचा भाजप आणि एनडीएचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक प्रशासकीय घटकात स्थानिक पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन करून नागरिकांना सेवाकार्यात सहभागी करून घेतले जाणार आहे.

17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत देशभर होणाऱ्या या अभियानातून सेवा, सहकार्य आणि लोकसहभागाची भावना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.