पहिला मुक्काम बीडच्या पाटोद्यात; मनोज जरांगे मुंबईला कोणत्या मार्गाने जाणार? मराठा आंदोलकांना तयारीच्या सूचना

पहिला मुक्काम बीडच्या पाटोद्यात; मनोज जरांगे मुंबईला कोणत्या मार्गाने जाणार? मराठा आंदोलकांना तयारीच्या सूचना

मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईकडे जाणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रवासाचा मार्ग जाहीर केला आहे. त्यांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे होणार आहे. 16 सप्टेंबरचा दुसरा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे होणार आहे. त्यानंतर तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसरमध्ये केला जाणार आहे.

 पुण्यातून कोणत्याही मार्गाने पुढे गेलं तरी मुंबईला जाता येतं. त्यानंतर चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे होणार आहे. खोपोली की कोपरखैरणे, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, खोपोली हा मुक्काम निश्चित मानण्यात येत आहे. त्यानंतर आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असल्याने तिथल्या सर्व मराठा बांधवांनी तयारीला लागावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. श्रीगोंदा तालुक्यातील मराठा समाजाने, तसेच हडपसर आणि पुणे शहरातील मराठा बांधवांनीही तयारीला लागावं, असं त्यांनी सांगितलं.

 रायगड जिल्ह्यातील आणि नवी मुंबईतील खोपोली व कोपरखैरणे परिसरातील मराठा बांधवांनीही कामाला लागावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. पाचव्या दिवशी सकाळी 10 वाजता आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. आपण ज्या मार्गाने जाणार आहोत, त्या मार्गावर म्हणजेच अंतरवाली, शहागड, गेवराई, बीड, मांजरसुभा, लिंबा गणेश मार्गे पाटोदा या रस्त्यावरून मुंबईकडे निघणारे मराठा बांधव हे समाजाच्या अस्तित्वासाठी चालले आहेत, असं जरांगे यांनी म्हटलं.

 या मार्गावरून जे मराठा बांधव मुंबईला येणार नाहीत, त्यांनी वाटेत येऊन आशीर्वाद द्यावा आणि मुंबईकडे जाणाऱ्या बांधवांना निरोप द्यावा, असंही त्यांनी सांगितलं. समाजासाठी एक दिवस देऊन आम्हाला आशीर्वाद द्या आणि पुन्हा घरी परत जा, असं आवाहन त्यांनी केलं. मनोज जरांगे यांनी पुढे सांगितलं की, ज्या तारखा जाहीर केल्या आहेत, त्या दिवशी मराठा समाजाने रस्त्यावर उतरावं. काम, नोकरी आणि व्यवसाय बंद ठेवून सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. "तुमच्या अंगात मराठ्यांचं रक्त खेळतंय असं वागा," असं म्हणत त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं.

 "चिखलाने पाय भरले असले तरी शेतातून पळत या. आम्ही ज्या मार्गाने मुंबईला चाललो आहोत, त्या मार्गावर आपल्या मुंबईला जाणाऱ्या लेकराला आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर या," असंही मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना अडवू नये, असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे. गेल्यावेळी मराठे शांततेत मुंबईत आले होते आणि परत गेले होते. त्यामुळे सरकार मराठ्यांचा रोष ओढवून घेणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 मराठ्यांना अडवलं तर मराठा समाजाचं मतदान तुटेल आणि त्यामुळे सरकार अडचणीत येईल, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. रस्त्यावर पोलिसांना अडवण्याचे आदेश दिले जाणार नाहीत आणि आझाद मैदानातील उपोषणही रोखलं जाणार नाही, असा दावा त्यांनी केला.एखाद्या पोलिसाने शहाणपणा केला तर त्याच्याबाबत नंतर पाहू, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाची तयारी आणि पुढील घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.