आधी घरी जेवणाचं निमंत्रण, आता अमृता फडणवीसांचं जरांगेंना आवाहन; म्हणाल्या, 'माझा भाऊ जे करेल ते शांततेतच करेल'
मुंबई (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा भावनिक साद घातली आहे. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे हे आपल्या भावासारखे असल्याचं सांगत त्यांना थेट घरी जेवणासाठी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्याबाबत भाष्य केलं आहे.

राज्यात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. हे दिवस लक्षात घेता "माझा भाऊ जे काही करायचं ते शांततेपूर्वकच करेल," असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्या शनिवारी अहिल्यानगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. अमृता फडणवीस यांनी अहिल्यानगर येथे आयोजित समर्पण चतुर्मास कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील आहे. राज्य सरकार या विषयावर नक्कीच मार्ग काढेल, असा विश्वासही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला.
यापूर्वी अमृता फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना मुंबईत आपल्या घरी जेवायला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी त्यांनी जरांगे यांचा उल्लेख 'भाऊ' असा केला होता.
यावर मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली होती. "ताईने सांगितलंय ना, मग जेवायला पण जाऊ. पण भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भावाला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा. मी भाऊबीजेला जेवायला येईन. बहिणीने आम्हाला भाऊबीजेला बोलवावं, साडीचोळी घेऊन जाऊ," असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथे मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. गणपतीच्या काळात जरांगे मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांसमोर परिस्थिती हाताळण्याचं मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने सध्या मनोज जरांगे यांच्याशी कोणतीही थेट चर्चा न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घेणार आणि मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.




