सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं; पण 'कॉकरोच जनता पार्टी' आंदोलनावर ठाम
मुंबई (प्रतिनिधी) : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांचं उपोषण अखेर मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सरकारकडून काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.

मात्र, वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी आंदोलन अद्याप संपलेलं नाही. 'कॉकरोच जनता पार्टी'चे प्रमुख अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केलं आहे की, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत त्यांचं शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहणार आहे.
अभिजीत दीपके यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं,"सोनम सरांनी २६ दिवसांनंतर उपोषण संपवल्याने आम्हाला दिलासा मिळाला आहे आणि त्यांचे आम्ही आभारी आहोत. मात्र, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत जंतर-मंतरवरील 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन सुरूच राहील."
दरम्यान, सरकारने आंदोलनकर्त्यांसमोर तीन महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत. २० जुलैच्या संसद मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर संसदेत चर्चा केली जाईल. तसेच, NEET पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याच्या मागणीवरही सकारात्मक विचार केला जाईल.
या आश्वासनांनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतलं असलं, तरी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार 'कॉकरोच जनता पार्टी'ने व्यक्त केला आहे.




