महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिगरमराठा असल्याने जातीय आकसापोटी मनोज जरांगेंचं आंदोलन; गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिगरमराठा असल्याने जातीय आकसापोटी मनोज जरांगेंचं आंदोलन; गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांना अंतरवाली सराटी आणि मुंबई, यापैकी कुठेही आंदोलन करू देऊ नका. पोलिसांनी मंत्रालयातील कोणाचीही वाट पाहू नये. या प्रकरणात कायदा आणि धमक्यांना गांभीर्याने घ्यावं, अशी मागणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मनोज जरांगे यांचं हे आंदोलन विशिष्ट राजकीय कारणासाठी होत असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिगरमराठा समाजातील असल्यामुळे हे आंदोलन केलं जात असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात राजकीय व्यक्तीही सक्रिय आहेत. माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा समाजातील इतर नेतेही यामध्ये सक्रिय असल्याचा दावा सदावर्ते यांनी केला. या आंदोलनाला सत्तेतील आणि सत्तेबाहेरील मराठा समाजाचा थेट पाठिंबा असल्याचंही त्यांनी म्हटलं.“जातीय आकसापोटी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. मनोज जरांगे हा एक प्यादा आहे. तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सेवक आहे. जरांगे मुख्यमंत्र्यांच्या घराला टार्गेट करण्याची भाषा करतो, तरी एकनाथ शिंदे मूग गिळून गप्प बसले आहेत. फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर सत्तेतील इतर मंत्री विखे-पाटीलही मवाळपणे बोलतात. विखे-पाटील यांनी कधीच मनोज जरांगे पाटील यांचा निषेध केला नाही,” असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

“मराठा भावांना मराठा आरक्षण नको, तर EWS आरक्षण हवं, असे मला अनेक कॉल्स येत आहेत. ‘पाटील’ नावाची पदे संविधानामध्ये मला दिसत नाहीत. गावांमध्ये पाटील असतो, तो बौद्ध किंवा आदिवासी समाजाचाही असू शकतो. मनोज जरांगे म्हणतो की मला पाटील म्हणा. मनोज जरांगे पाटील हा पॉलिटिकल एक्सटॉर्शन करणारा माणूस आहे,” अशी टीका सदावर्ते यांनी केली.

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला डिस्टर्ब करण्याची भाषा केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. “रेल्वेची पटरी उखडून टाकू, विमानतळ उखडून टाकू, असं बरळलं जात आहे. महत्त्वाच्या व्यक्तींच्या घरांना टार्गेट करू, ही त्यांची अतिरेकी भाषा आहे. आझाद मैदानाच्या परिसरात अडीचशेपेक्षा जास्त लोक आले तरी हा परिसर डिस्टर्ब होतो. पण मराठा आंदोलनाला चाळीस हजार आंदोलक येणार आहेत,” असं सदावर्ते म्हणाले.त्यामुळे पोलिसांनी गंगाधर काळकुट्टे यांचा अर्ज निकाली काढून या ठिकाणी आंदोलनाला परवानगी देऊ नये, अशी मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

दरम्यान, मनोज जरांगे शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे त्यांच्या 11व्या आमरण उपोषणाला सुरुवात करत आहेत. सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. रात्री पोलिसांकडून आंदोलनादरम्यान कायदा-सुव्यवस्था आणि नियमांचं पालन करण्यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली.

58 लाख कुणबी नोंदींचं प्रमाणपत्र तसेच व्हॅलिडिटी देण्यात यावी, हैदराबाद गॅझेटमधील संकेताप्रमाणे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी देण्यात यावी, सातारा-कोल्हापूर गॅझेटियरचा जीआर काढावा, आंदोलकांवरील सर्व गुन्हे माफ करावेत, तसेच स्वतंत्र कुणबी मंत्रालयाची स्थापना करावी, या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहेत.