वैद्यकीय क्षेत्राला काळीमा! अल्पवयीनच्या बाळाच्या विक्रीचा प्रयत्न; 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध FIR
मुंबई (प्रतिनिधी) : वैद्यकीय क्षेत्रावरील लोकांचा विश्वास कोरोना काळापासून कमी झाल्याचं सातत्याने दिसून येत आहे. त्यातच, अलिकडे अवैध गर्भपात प्रकरणे गाजत असून दोन दिवसांपूर्वीच दौंडमधील अशी प्रकरणे समोर आली आहेत. आता, मालेगाव शहरात माणुसकीला आणि वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गर्भवती असलेल्या एका 16 वर्षीय बालिकेची कुठलीही नोंद न करता खासगी रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केली. त्यानंतर बालिकेने जन्म दिलेल्या नवजात बाळाला विक्री करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जितेंद्र डोलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चार डॉक्टरांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगावमधील या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून यातील मुख्य संशयित आरोपी हा मालेगाव सामान्य रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक म्हणून कामकाज पाहिलेला डॉक्टर आहे. याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन बालकेशी शाररीक संबंध प्रस्थापित करुन तिला अज्ञात व्यक्तीने गर्भवती केले होते. तिला प्रसुतीसाठी शहरातील ' हिराई ' रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही पोलिस व आरोग्य प्रशासनाला माहिती देण्यात आली नाही. तसेच आवश्यक कायदेशीर कागदपत्रे तयार न करता वैद्यकीय नियमांचे उल्लंघन करून याठिकाणी डॉ. किशोर डांगे, डॉ. किशोरी डांगे, डॉ. अनुजा शेवाळे, डॉ. प्रिती जाधव यांनी तिची शस्त्रक्रियेद्वारे (सिजरीन) प्रसुती केली. मात्र, यानंतर सदर अल्पवयीन बालिका फरार झाली.
दरम्यान, तिने जन्म दिलेल्या नवजात बालकाला विक्री करण्याचा देखील प्रयत्न झाला असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी डॉक्टरांसह नवसीन रफिक शेख, मोहम्मद फईम मोहम्मद शफिक, सार्थक प्रविण जगताप (सर्व रा. मालेगाव) यांच्यासह बालिकेला गर्भवती करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




