विमानाने आणि अलिशान गाड्यांतून पुण्यात दाखल झाले तरुण; प्रोजेक्ट एक्स’वर पोलीस आयुक्तांचे वक्तव्य
पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील आयटी हब आणि पब संस्कृतीवर पोलिसांची करडी नजर असताना, आता शहराबाहेरील ग्रामीण भागात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल बेकायदेशीर पार्टीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यात आयोजित 'प्रोजेक्ट एक्स' या हाऊस पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 78 जणांवर गुन्हा दाखल केला असून तो अलिशान बंगला सील केला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड केले आहे. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यासाठी वापरण्यात आलेली तब्बल 1 कोटी 4 लाख रुपयांची डीजे साऊंड सिस्टिम पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच, पार्टीत बेकायदेशीरपणे विदेशी मद्याची विक्री आणि सेवा केली जात होती, तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे 10 लाख रुपयांचे विदेशी मद्य हस्तगत केले आहे.
या हायप्रोफाईल पार्टीमध्ये अमली पदार्थांचा वापर झाल्याचा तीव्र संशय पोलिसांना आहे. कारवाईदरम्यान अनेक तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आल्याने, त्यापैकी संशयास्पद वाटणाऱ्या २३ जणांचे रक्ताचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा असून, रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार आणखी गंभीर कलमे वाढवली जाण्याची शक्यता आहे.




