अमित शाह अन् मोदी गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांची जहरी टीका, डीबी पाटील' नामकरणावरूनही घेरले!
नवी दिल्ली: जंतर-मंतरवरील आंदोलकांवर झालेला लाठीमार आणि अश्रूधुराच्या वापरावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसले आहेत ते पाहता ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी 'गुंगा गुड्डा' झाले आहेत," अशी खोचक टीका राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केली. जोपर्यंत गृहमंत्री संसदेत येऊन जंतर-मंतरवरील कारवाईचे आदेश कोणी दिले हे स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

'राजकारणात आहात तर टीका सहन करायला हवी!'
पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या वक्तव्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, "सुनेत्रा पवारांच्या जागी एखादा पुरुष मंत्री असता तर त्यांनाही 'गुंगा गुड्डा' म्हटले असते. आपण राजकारणात आहोत, त्यामुळे अशी टीका सहन करायला हवी आणि भविष्यात चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. भूतकाळात इंदिरा गांधींनाही 'गुंगी गुडीया' म्हटले गेले होते, पण त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले."
तसेच, सुनेत्रा पवार या राज्याच्या घटनात्मक पदावर कार्यरत आहेत. काँग्रेस कार्यालयावर हल्ले करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या लोकांनी जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
विमानतळ नामकरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करा!
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर करून दिल्लीकडे पाठवला होता. त्यामुळे आता ही पूर्ण जबाबदारी राज सरकारची आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करण्यापेक्षा आंदोलकांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दारात जाऊन आंदोलन केले पाहिजे."




