जलजीवन मिशन निधी वाटप तात्पुरते थांबवा; कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची जिल्हा परिषदेकडे मागणी

जलजीवन मिशन निधी वाटप तात्पुरते थांबवा; कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची जिल्हा परिषदेकडे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी): जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी आलेला निधी वाटप करण्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या बदलांवर कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने तीव्र आक्षेप घेतला आहे. सुधारणात्मक पुनर्जाेडणी कामांचा निधी मिळेपर्यंत सध्या आलेल्या निधीचे वाटप तात्पुरते थांबवावे आणि तो सरसकट वितरित करावा, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांना देण्यात आले. तर मागणी मान्य न झाल्यास येत्या १० ऑगस्ट २०२६ रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाला आहे. हा निधी नवीन योजनांसाठी देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत विभागामार्फत टेंडर प्रक्रियेद्वारे निधी वितरण करताना नवीन योजना व सुधारणात्मक पुनर्जाेडणी असा कोणताही भेदभाव किंवा वेगळा विषय केलेला नव्हता.

त्यामुळे प्राप्त झालेला सर्व निधी हा सरसकट वितरित करण्यात यावा, अन्यथा सुधारणात्मक पुनर्जाेडणी कामांचा निधी प्राप्त होईपर्यंत या निधीचे वाटप करू नये, अशी स्पष्ट भूमिका असोसिएशनने घेतली आहे.

येत्या १० ऑगस्टपर्यंत याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास होणाऱ्या अन्यायाविरोधात जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देऊन या सर्व प्रकारास जिल्हा परिषद प्रशासनच जबाबदार राहील, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

हे पत्र कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषद अध्यक्षांना सादर करण्यात आले आहे.

यावेळी किशोर जामदार, बाबा नांदेकर, दयानंद शिंदे, संदीप सावंत, निलेश पाटील, मधुकर कुंभार, युवराज रसाळ, सोहम दळवी, भरत माळी, विशाल पाटील यांच्यासह पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे उपस्थित होते.