कागलचा जयसिंगराव तलाव आता 'तुडुंब' भरणार; अर्धवट कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश

कागलचा जयसिंगराव तलाव आता 'तुडुंब' भरणार; अर्धवट कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश

कोल्हापूर/ प्रतिनिधी (मुंबई ) : कागल शहराची तहान भागवणाऱ्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावाची पाणी पातळी सुधारण्यासाठी आणि परिसरातील सिंचनाचा प्रश्न मिटवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या तलावाजवळचा अर्धवट राहिलेला कालवा अस्तरीकरणासह (Lining) तातडीने पूर्ण करा, अशा स्पष्ट सूचना जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत.

मंत्रालयात जलसंपदा मंत्री डॉ. विखे-पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कागलच्या पाणीप्रश्नावर सकारात्मक चर्चा होऊन प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

या उच्चस्तरीय बैठकीला के.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगरसेवक प्रवीण काळबर, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, तसेच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य अभियंता आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

तलावातील पाणी घटण्याचे कारण आणि मागण्या:

·         पातळीतील फरक: कालव्याची पातळी खाली आणि तलावाची पातळी उंचावर गेल्यामुळे कालव्यातून तलावात येणारे पाणी बंद झाले आहे, याचे सविस्तर स्पष्टीकरण नगरसेवक प्रवीण काळबर यांनी बैठकीत मांडले.

·         पाणीपट्टी माफीची मागणी: दूधगंगा डाव्या कालव्यामुळे तलावातील पाणीसाठा घटला असल्याने, तलाव भरण्यासाठी लागणारी पाणीपट्टी माफ करावी आणि शहराला मोफत पाणी द्यावे, अशी मागणी कागल नगरपालिकेने केली.

·         प्रलंबित कामे: दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्पांतर्गत कागल नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित कामे तातडीने सुरू करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

के.डी.सी.सी. बँकेचे संचालक भैय्यासाहेब माने यांनी कागल शहरातील केवळ दोन किलोमीटरचा कालवा अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून देत, त्याचे काम पूर्ण करून अस्तरीकरण करण्याची मागणी केली. त्यांनी अभ्यासू वृत्तीने खालील प्रमुख मुद्दे उपस्थित केले:

1.      पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट: सध्या जुलै २०२२ पासून दूधगंगा डाव्या कालव्याचे पाणी किमी ६५ (जयसिंगराव तलाव) पर्यंत आले आहे. मात्र, कागल तालुक्यातील किमी ६५ ते ७२ आणि हातकणंगले तालुक्यातील किमी ७२ ते ७६ या अंतरात अद्याप पाणी पोहोचणे बाकी आहे.

2.      भराव आणि विहिरींचे संपादन: पाझर तलावा शेजारील भरावाचे काम (काळी माती मुरमाअभावी) आणि विहिरींचे संपादन अद्याप प्रलंबित आहे.

3.      पाईपलाईनचे अडथळे: कागल कत्तलखाना ते हुपरी कारखान्यापर्यंत कॅनॉलचे काम झाले असले, तरी पुढील कालव्याला छेदणाऱ्या शेतीच्या पाईपलाईन्समुळे कामात अडथळे येत आहेत.

4.      डिझाईन मंजुरी: उर्वरित बांधकामाचे डिझाईन आणि ड्रॉईंग अजून मंजूर झालेले नाही.

5.      ठेकेदारांच्या अडचणी: ठेकेदाराचे मनुष्यबळ आणि यंत्रणा जागेवर उपलब्ध असूनही किमी ७६ पर्यंत ज्या गतीने पाणी पोहोचायला हवे होते, ते पोहोचलेले नाही. त्यामुळे ठेकेदारांच्या अडचणी सोडवून कामाला गती द्यावी.

"कागलच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या विषयांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. संबंधित कामे लवकरच प्रत्यक्षात सुरू होऊन कागल शहर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि विकासकामांना निश्चितच गती मिळेल." — हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण मंत्री)

या सर्व मुद्द्यांची गंभीर दखल घेत जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व विषयांवर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून कामांना गती देण्याचे कडक निर्देश दिले आहेत.