राजे बँककडून ‘राजमाता जिजाऊ महिला बचत गट योजना’ शुभारंभ-राजे समरजितसिंह घाटगे
कागल ( प्रतिनिधी ) : महिला उद्योजकतेस प्रोत्साहन देण्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने सुरू केलेल्या राजमाता जिजाऊ महिला बचत गट योजनेच्या माध्यमातून मोठ्या संख्येने उद्योजक घडवून कागल तालुक्याची ओळख महिला उद्योजकांचा तालुका अशी निर्माण करूया,असे प्रतिपादन शाहू ऊद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.

येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक मार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ महिला बचत गट योजने’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.त्यांच्यासह बँकेच्या अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे व अन्य मान्यवरांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, “राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या करता येणाऱ्या गृहउद्योगांचे व विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, भांडवलाअभावी अनेक महिलांना व्यवसाय सुरू करता येत नाही. वैयक्तिक कर्ज घेण्याबाबत महिलांमध्ये संकोच असतो आणि ते तुलनेने महागही पडते. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून एकत्र आलेल्या महिलांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला अधिक आत्मविश्वासाने व्यवसायात उतरतील.
बँकेच्या अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे म्हणाल्या,महिला उद्योजकतेस नवे बळ देत कागल तालुक्याची ओळख ‘महिला उद्योजकांचा तालुका’ अशी निर्माण करण्याचा संकल्प शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे.महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन उद्योग सुरू करावेत. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी समिती घेत आहे. आता भांडवलाची अडचण दूर झाल्याने महिलांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमास संचालक रणजीत पाटील, संजय पाटील,अरुण गुरव,दत्तात्रय खराडे, संजय चौगुले,प्रकाश पाटील,अमोल शिवई, नम्रता कुलकर्णी,राघू हजारे,प्रवीण कुराडे, कार्यकारी संचालक अरुण पाटील आदी उपस्थित होते.माजी अध्यक्ष व संचालक एम. पी. पाटील यांनी स्वागत केले, तर उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे यांनी आभार मानले.
*राजे बँकेच्या सहकार्याने महिलांनी यशस्वी उद्योजक व्हावे-नजमा शेख*
बचत गट समन्वयक नजमा शेख म्हणाल्या, “विविध घटकांच्या माध्यमातून आजवर महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे. आकर्षक योजना व सवलती उपलब्ध असतानाही काही प्रमाणात उदासीनता दिसून येते. वाढत्या महागाईच्या काळात व्यवसाय हा केवळ घरखर्चाला हातभार नसून कुटुंबाच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत ठरू शकतो. अनेक महिलांनी हे सिद्ध केले आहे. राजे बँकेच्या नव्या योजनेचा लाभ घेऊन अधिकाधिक महिलांनी यशस्वी उद्योजक बनावे.”




