कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतीपदी प्रा. शेखर देसाई; उपसभापतीपदी पांडुरंग काशिद
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रा. शेखर देसाई यांची, तर उपसभापतीपदी पांडुरंग काशिद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मल्टीपर्पज हॉलमध्ये ही सभा पार पडली. मावळते सभापती नानासो कांबळे यांनी राजीनामा दिल्याने आणि उपसभापती राजाराम चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवडणूक झाली. सभेपूर्वी नेत्यांनी निश्चित केलेल्या नावांचा बंद लिफाफा जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील व 'गोकुळ'चे माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

सभेत नूतन सभापती प्रा. देसाई यांच्या नावाचा प्रस्ताव मावळते सभापती नानासो कांबळे यांनी मांडला, त्यास संचालक संदीप वरंडेकर यांनी अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी पांडुरंग काशिद यांच्या नावाचा प्रस्ताव संचालक शिवाजी पाटील यांनी मांडला, त्यास बाळासो पाटील यांनी पाठिंबा दिला. निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
बाजार समिती आदर्श बनवण्याचा निर्धार
निवडीनंतर बोलताना नूतन सभापती प्रा. शेखर देसाई म्हणाले, "माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष असताना बाजार समितीची ठेव वाढवून उल्लेखनीय काम केले. त्यांचाच आदर्श ठेवून आपण काम करणार आहोत." तसेच, गुळाची आवक वाढवण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा करून, कोल्हापुरी गुळाचा समावेश शालेय पोषण आहारात करण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुळाला पोषण आहारात स्थान:
कोल्हापुरी गूळ हा पौष्टिक असल्याने त्याचा शालेय पोषण आहारात समावेश व्हावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ संचालक प्रकाश देसाई यांनी व्यक्त केली.
स्थैर्य अन् शिस्त:
बाजार समितीतील अल्पकालीन सभापती पदाची पद्धत थांबवून प्राध्यापक असलेल्या प्रा. देसाई यांनी समितीला आदर्श बनवावे, असे मत नंदकुमार वळंजू यांनी मांडले.
सुविधा व सुशोभीकरण:
मार्केट यार्डातील शेतकरी निवासाची दुरवस्था झाली असून त्याचे सुशोभीकरण व्हावे आणि दररोज येणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या सुविधांचे योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी संचालक सुयोग वाडकर यांनी केली.
'नेत्यांवरील निष्ठा कायम राहिली' - उपसभापती काशिद
"दोन वर्षांपूर्वी सभापतीपदाची संधी हुकल्यानंतर आपण संचालकपदाचा राजीनामा दिला होता, परंतु तो मंजूर झाला नाही. तरीही आपण नेत्यांवरील निष्ठा ढळू दिली नाही. आज मिळालेल्या संधीबद्दल नेत्यांचे आभार व्यक्त करतो," असे नूतन उपसभापती पांडुरंग काशिद यांनी सांगितले.
यावेळी संचालक भारत पाटील-भुयेकर, शंकर पाटील, शिवाजी पाटील, कुमार आहुजा, संचालिका मेघा देसाई, सौ. पाटील, तसेच उपसचिव वसंतराव पाटील, जीवन पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत सचिव तानाजी दळवी यांनी केले तर आभार मावळते सभापती नानासो कांबळे यांनी मानले.




