गरिबांच्या घराचं स्वप्न होणार साकार! मलेशियातील माय वन तंत्रज्ञानाने भंडाऱ्यात उभारली बिना विटांची म्हाडा वसाहत; एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण
मुंबई (प्रतिनिधी) : अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना हक्काचं आणि परवडणारं घर मिळावं, यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विभागाने भंडाऱ्यात 224 फ्लॅट्सची सुसज्ज वसाहत उभारली आहे. मलेशियातील अत्याधुनिक ‘माय वन टेक्नॉलॉजी’चा वापर करून उभारण्यात आलेली ही भंडारा जिल्ह्यातील पहिलीच बिना विटांची वसाहत आहे.ग्राउंड प्लस तीन मजल्यांच्या एकूण 7 विंग्समध्ये ही वसाहत तयार करण्यात आली असून, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वसाहतीचं थाटात लोकार्पण होणार आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे भंडाऱ्यातील अल्प उत्पन्न गटातील अनेक कुटुंबांचं हक्काच्या, मजबूत आणि अत्याधुनिक घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होणार आहे.

दरम्यान, एकूण 224 पैकी 200 फ्लॅट्सवर पीएम आवास योजनेंतर्गत विशेष सबसिडी मिळणार आहे. म्हाडाची मूळ किंमत 11 लाख 98 हजार 934 रुपये असून, सबसिडीनंतर हा फ्लॅट नागरिकांना अवघ्या 9 लाख 48 हजार 934 रुपयांत उपलब्ध होणार आहे.पती-पत्नीचं एकत्रित वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असणारे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरतील. त्यामुळे गरिबांच्या घराचं स्वप्न साकार होणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती म्हाडा गृहनिर्माण वसाहतीच्या अभियंता रविना नरवरिया यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या पुणे मंडळाने संगणकीकृत सोडतीद्वारे 4,462 परवडणारी घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या घरांच्या किमती 11 लाख ते 64 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. ही घरे पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांतर्गत येतात. म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, या सोडतीसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. तसेच, अनामत रकमेचा अर्थात Earnest Money Deposit चा ऑनलाइन भरणाही 15 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत स्वीकारला जाणार आहे.
म्हाडाच्या माहितीनुसार, अर्जदार 16 सप्टेंबर 2026 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करू शकतात. स्वीकृत अर्जांची तात्पुरती यादी 29 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. या तात्पुरत्या यादीबाबतचे दावे आणि हरकती 1 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करता येणार आहेत.




